फीफा विश्वचषकाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू, दिग्गजांचा दर्शनी सामना आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:19 AM2017-09-06T00:19:09+5:302017-09-06T00:19:37+5:30
१७ वर्षे गटाच्या फीफा विश्वचषकाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. अवघे ३० दिवस उरले असताना आज बुधवारी येथील डी.आय. पाटील स्टेडियममध्ये जगभरातील माजी दिग्गजांचा सहभाग असलेल्या दर्शनी सामन्याचे आयोजन होत आहे.
नवी मुंबई : १७ वर्षे गटाच्या फीफा विश्वचषकाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. अवघे ३० दिवस उरले असताना आज बुधवारी येथील डी.आय. पाटील स्टेडियममध्ये जगभरातील माजी दिग्गजांचा सहभाग असलेल्या दर्शनी सामन्याचे आयोजन होत आहे.
फीफा लीजेन्डस् विरुद्ध भारतीय लीजेन्ड्स यांच्यात खेळल्या जाणाºया या सामन्याचे आकर्षण असतील ते फ्रान्सच्या विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू मार्सेल, डीसेले, कोलंबियाचा कार्लोस, वाल्डेरमा, स्पेनचा फर्नांडो मॉरिटेस, मेक्सिकोचा जॉर्ज कापोन्स, नायजेरियाचा इमान्युएल अमुनेके आदी.
२० मिनिटांचा हा सामना होईल. दोन्ही हाफ प्रत्येकी दहा मिनिटांचे असतील. भारतीय संघातून माजी कर्णधार रेनेडीसिंग, महिला फुटबॉलपटू बेमबेमदेवी, महिला संघाची सध्याची कर्णधार बालादेवी हे खेळणार आहेत. माजी कर्णधार बायचुंग भुतिया याचा देखील संघात समावेश होता पण पाठदुखीमुळे तो खेळू शकणार नाही.
नुकतेच प्रसिद्ध झालेले फीफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे गीत सामन्याच्या मध्यंतराला वाजविले जाईल. याप्रसंगी सर्व माजी दिग्गजांच्या हस्ते फीफा विश्वचषकाचे अनावरण होणार आहे. (वृत्तसंस्था)