FIFA World Cup 2018 : क्रोएशियाचा नायजेरियावर दिमाखदार विजय, 'ड' गटात पहिल्या स्थानी विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 02:50 AM2018-06-17T02:50:29+5:302018-06-17T02:55:46+5:30
फिफा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियानं मधल्या फळीतील बलाढ्य खेळाडूंच्या जोरावर नायजेरियावर मात केली.
सेंट पीटर्सबर्ग- कर्णधार लुका मॉड्रिक याने (71व्या मिनिटाला) पेनल्टीवर मारलेल्या गोलमुळे क्रोएशियाने फिफा विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ‘आफ्रिकन पॉवर हाऊस’ नायजेरियाचा 2-0ने पराभव केला. त्याआधी नायजेरियाचा मिडफिल्डर व ‘सर्वोत्तम पासेस देणारा’ खेळाडू अशी ख्याती असलेल्या ओघेनेकारो इटेबो याला मोठी चूक भोवली. त्याने 32व्या मिनिटाला स्वयंगोल नोंदविल्यामुळे मध्यंतरापर्यंत ‘ड’ गटाच्या सामन्यात क्रोएशिया 1-0ने आघाडीवर होता.
क्रोएशियाचा मांडझोकारोने मारलेला हेडर डिफ्लेक्ट होऊन इटेबोच्या पायाला लागला. नायजेरियाचा गोलकिपर ओझोहो याला काही कळण्या आधीच चेंडू गोलजाळीत स्थिरावल्याने क्रोएशियाला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. 70व्या मिनिटाला नायजेरियाचा ट्रूस्ट इकाँग याने प्रतिस्पर्धी खेळाडूला डीमध्ये अडथळा आणून खाली पाडल्याने रेफ्रीने पेनल्टी बहाल केली होती. त्यावर पाचयांदा विश्वचषक खेळणा-या मॉड्रिकने गोलजाळीचा वेध घेत विश्वचषकात पहिला गोल नोंदविला.
क्रोएशियाने 1998साली फ्रान्समध्ये उपांत्य फेरी गाठली होती. त्यांनी उपांत्यपृर्व सामन्यात जर्मनीला धूळ चारली होती. दुसरीकडे नायजेरिया संघात इंग्लिश लीग खेळणारे अनेक खेळाडू असल्यामुळे क्रोएशियावर ते भारी पडू शकतात, असा अनेकांचा समज होता. पण पारडे फिरले. क्रोएशियाने नायजेरियाच्या खेळाडूंना निष्प्रभ ठरविले. नायजेरिया सराव सामन्यात इंग्लंड आणि झेक प्रजासत्तकाकडून पराभूत झाला आहे. नायजेरियाची ओळख सुपर ईगल्स अशी असून विश्वचषकातील सर्वांत युवा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आज त्यांना क्रोएशियाची बचावफळी भेदणे कठीण गेले.