FIFA World Cup Quarter finals : पाचवा दावेदारही OUT, ब्राझिलची एक्सिट !!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 01:25 AM2018-07-07T01:25:00+5:302018-07-07T02:05:31+5:30
जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागला. बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कजान - जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागला. बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. 1986 मध्ये त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ब्राझिलने अखेरच्या मिनिटाला सोप्या संधी गमावल्याने त्यांना विजय खेचून आणता आला नाही. 2002 नंतर त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच राहीली आहे. उपांत्य फेरीत बेल्जियमला फ्रान्सचा सामना करावा लागणार आहे.
#BEL WIN!
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 6, 2018
The @BelRedDevils knock Brazil OUT of the #WorldCup to set up a semi-final clash with France! #BRABEL 1-2#WorldCuppic.twitter.com/JDCh46gO4t
सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझिलच्या वाट्याला पहिल्या सत्रात अपयश आले. गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि खेळाडूंनी अप्रतिम बचाव करत बेल्जियमने 2-0 अशा फरकाने ब्राझिलला पहिल्या सत्रात पिछाडीवर टाकले. बेल्जियम आणि ब्राझील या दोन्ही संघानी सुरूवातीपासून आक्रमणावरच भर दिला होता. बेल्जियमचे खेळाडू माजी विजेत्यांवर भारी पडताना पाहायला मिळाले. सामन्याच्या 13व्या मिनिटाला बेल्जियमने आघाडी घेतली. व्हिसेंट कम्पनीच्या कॉर्नर किकवरील चेंडू हेडरव्दारे गोलजाळीवरून टोलावण्याचा ब्राझिलच्या फर्नांडीनोचा प्रयत्न फसला. चेंडू त्याच्या हाताच्या कोप-याला लागून जलद गतीने गोलजाळीत विसावला आणि प्रतिस्पर्धीच्या स्वयंगोलवर बेल्जियमने आघाडी घेतली. त्यानंतर सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझीलच्या खेळाडूंना यशप्राप्ती होत नव्हती. 31व्या मिनिटाला डेव्हीड ब्रुयनेने लाँग रेंजवरून अप्रतिम गोल करत बेल्जियमची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील 100 वा गोल ब्रुयनेच्या नावावर नोंदवला गेला आहे.
Key stats:
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 6, 2018
👉 @DeBruyneKev became the 100th player to score at this #WorldCup(excluding own goals)
👉 #BRA have avoided defeat once after trailing by at least two goals at the World Cup, in a 4-2 win against Sweden in 1938#BRABEL // #WorldCuppic.twitter.com/B5e2si2TfU
दुस-या सत्रात ब्राझिलने विलियनला बाकावर बसवून फर्मिनोला पाचारण केले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या सत्रात दोन किंवा त्याहून अधिक गोलने पिछाडीवरून एकाही संघाला विजय मिळवता आलेला नाही. ब्राझिलने विजयासाठी जंगजंग पछाडले, परंतु नशीब त्यांच्यावर रुसले होते. गोलपोस्टच्या अगदी जवळ जाऊनही त्यांना गोल करता येत नव्हता. प्रत्येकवेळी त्यांच्या तोंडचा घास कुणीतरी पळवत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ब्राझिलचे खेळाडू वैतागलेले पाहायला मिळाले. 76व्या मिनिटाला अखेर ब्राझिलला यशप्राप्त झाले. रेनाटो ऑगस्टोने अप्रतिम हेडर लगावत ब्राझिलचे गोल खाते उघडले. 21 प्रयत्नांनंतर ब्राझिलला मिळालेले हे पहिले यश ठरले. त्यानंतर सोप्या संधीवर गोल करण्यात आलेले अपयश ब्राझिलच्या पराभवाला कारणीभूत ठरले.