भारतासाठी चषक जिंकला, पण मणिपूरमध्ये गमावलं हक्काचं घर; कर्णधार राहतोय Relief Camp मध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 08:28 PM2023-09-16T20:28:07+5:302023-09-16T20:28:34+5:30
गेल्या आठवड्यात थिम्पू येथे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन SAFF १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावले.
मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरूच आहे, नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीत १७० हून अधिक जणांनी जीव गमावला आहे, तर हजारांहून अधिक जणं बेघर झाली आहेत. या बेघरांमध्ये भारताचा स्टार फुटबॉलपटूही आहे. गेल्या आठवड्यात थिम्पू येथे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन SAFF १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताला चषक जिंकून देणाऱ्या संघाचा सदस्य असलेला न्गामगौहो माटे ( Ngamgouhou Mate ) मणिपूरमध्ये जेव्हा परतला तेव्हा त्याचं हक्काचं घर उध्वस्त झालं होतं. त्याला आता रिलीफ कॅम्पमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार टेंगनौपाल जिल्ह्यातील आहे आणि त्याचे घर आता राहिलेले नाही. येथील जातीय हिंसाचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे घर जाळल्यामुळे त्याला कांगपोकपी जिल्ह्यातील एका मदत शिबिरात ठेवण्यात आले होते. राहण्यासाठी घर नसतानाही, त्याने आता मणिपूरमध्ये शांततेची अपेक्षा केली आहे. "माझ्या सभोवतालचे लोक सुरक्षित आहेत याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आमच्या राज्याला या मोठ्या हिंसाचाराचा फटका बसला आहे आणि आता मला वाटते की आपण शांततेची अपेक्षा केली पाहिजे," असे त्याने पत्रकारांना सांगितले.
काल कांगपोकपी येथे माटे आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. "आम्हाला आमच्या Meitei सहकाऱ्यांवर प्रेम आहे. आम्ही मैत्रीपूर्ण आहोत आणि जसे आम्ही एकत्र ट्रॉफी उचलली, आम्हाला मणिपूरमध्ये शांतता हवी आहे," असे भारताच्या १६ वर्षांखालील फुटबॉल संघाचे सदस्य वुम्लेनलाल हँगशिंग म्हणाले.