फुटबॉलचे देव अवतरणार क्रीडा पंढरीत ; 27 एप्रिलला रंगणार बार्सिलोना आणि युवेंटसमध्ये सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 07:53 PM2018-04-04T19:53:08+5:302018-04-04T19:53:08+5:30
ज्या युरोपियन संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण भारतीय रात्र-रात्र जागतो, त्याच बार्सिलोना आणि युवेंटस संघाच्या रथी-महारथी खेळाडूंचा खेळ पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभणार आहे.
मुंबई : आजवर आपण नामांकित फुटबॉलपटू फक्त टीव्हीवर पाहिलेत किंवा वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल वाचलेय, पण येत्या 27 एप्रिलला हे नामांकित खेळाडू भारताची क्रीडा पंढरी म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमला उपस्थित राहणार आहेत. ज्या युरोपियन संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण भारतीय रात्र-रात्र जागतो, त्याच बार्सिलोना आणि युवेंटस संघाच्या रथी-महारथी खेळाडूंचा खेळ पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभणार आहे.
भारत हा क्रिकेटचीच नव्हे तर फुटबॉलचीही फार मोठी बाजारपेठ आहे. भारताचे फुटबॉल भवितव्य फार उज्ज्वल आहे, त्यामुळेच भारतात फुटबॉलची पाळेमुळे खोलवर रूजावी म्हणून सर्वच स्तरावर फार मोठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. नुकत्याच झालेल्या फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताने दमदार आणि स्फूर्तीदायक कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे भारतात फुटबॉलच्या विकासाला एक वेगळी चालना मिळाली होती. मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे पाठबळ आणि डॉ.विजय पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नवी मुंबईच्या क्रीडा पंढरीत स्पेनचा अव्वल संघ बार्सिलोना आणि इटालियन फुटबॉलची जान असलेल्या युवेंटस या दोन्ही युरोपियन संघांच्या माजी दिग्गजांना खेळविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.
मेस्सीकडून आदित्य ठाकरेंना जर्सी भेट
लवकरच बार्सिलोनाचे दिग्गज भारत भेटीवर येत आहेत. पण त्यापूर्वी हा संस्मरणीय सामना आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुंबई आदित्य ठाकरे यांना प्रेमाचे प्रतिक म्हणून फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीने आपली स्वाक्षरी असलेली बार्सिलोना क्लबची जर्सी पाठवली आहे. आज ती जर्सी आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीत डॉ.विजय पाटील यांनी स्वीकारली.
सामना नव्हे संस्मरणीय अनुभव
हा केवळ एक सामना नसून हा भारतीय क्रीडा विश्वासाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. माझ्यासाठी हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षणांपैकी एक आहे. डी.वाय.पाटील स्टेडियम उभारल्यानंतर या स्टेडियममध्ये भारतातील सर्व क्रीडा प्रकार इथे खेळले जावे, हे माझे स्वप्न होते. आपल्या स्टेडियमवर आयपीएलच्या दोन स्पर्धा झाल्या. नुकताच फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेच्या लढती झाल्या. आता फुटबॉलच्या देवांचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकर-नवी मुंबईकरांना आम्ही देतोय. फुटबॉलच्या विविध लीगसाठी रात्र जागवणारे भारतीय फुटबॉल चाहते या देवदर्शनासाठीही प्रचंड गर्दी करतील हा माझा विश्वास आहे. भारतीय फुटबॉलमध्ये अशा प्रकारचा सामना पहिल्याच होत असल्यामुळे क्रीडा पंढरीत फुटबॉल भक्तांचा सागर उसळणार हे निश्चित आहे.