फुटबॉल विश्वचषक पुरस्कार रकमेत स्त्री-पुरुष भेदभाव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 03:34 AM2018-10-27T03:34:23+5:302018-10-27T03:34:29+5:30
फिफाने पुरुष आणि महिला विश्वविजेत्यांना सारखी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
किगाली(रवांडा): फिफाने पुरुष आणि महिला विश्वविजेत्यांना सारखी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या पुरस्कार रकमेबाबत महिला फुटबॉलपटूंनी नाराजी व्यक्त करताच या सर्वोच्च संस्थेला दखल घ्यावी लागली. फिफा प्रमुख जियानी इन्फेटिनो यांनी फिफा विश्वविजेत्या पुरुष संघाला देण्यात येणारी तीन कोटी डॉलरची रोख रक्कम महिला विजेत्या संघालादेखील दिली जाईल, असे घोषित केले आहे.
फिफा परिषदेच्या बैठकीला येथे शुक्रवारी प्रारंभ झाला. त्याआधी आॅस्ट्रेलिया, नॉर्वे, स्वीडन आणि न्यूझीलंड या देशांमधील खेळाडूंच्या संघटनांनी २०१९ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकात मिळणाºया पुरस्कार रकमेत वाढ करण्याची एकमुखी मागणी केली होती.
इन्फटिनो यांनीही या मागणीचे समर्थन करुन सकारात्मक विचार पुढे केला. त्यांनी याविषयी म्हटले की, ‘ही मागणी ग्राह्य असून खेळाडू आणि संघटना स्वत:च्या अधिकाराची मागणी करीत आहेत. या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची ही सुरुवात आहे.’ त्याचप्रमाणे, ‘एक दिवस असा येईल की पुरुष फुटबॉलपटूंच्या तुलनेत महिला फुटबॉलपटू अधिक कमाई करताना दिसतील,’ असे भाकीतही इन्फेटिनो यांनी यावेळी केले आहे. (वृत्तसंस्था)