फुटबॉलपटू बफन का म्हणतोय, 'बुढ्ढा होगा तेरा बाप'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:37 PM2018-08-20T12:37:09+5:302018-08-20T12:38:00+5:30

एखादा खेळाडू साधारणपणे किती वयापर्यंत खेळतो? पस्तिशी..फारच थोडे त्याच्यापुढे आणि चाळीशीच्या पार म्हणजे तर डोक्यावरुन पाणी.

footballer buffun play with father and son | फुटबॉलपटू बफन का म्हणतोय, 'बुढ्ढा होगा तेरा बाप'!

फुटबॉलपटू बफन का म्हणतोय, 'बुढ्ढा होगा तेरा बाप'!

googlenewsNext

- ललित झांबरे 

एखादा खेळाडू साधारणपणे किती वयापर्यंत खेळतो? पस्तिशी..फारच थोडे त्याच्यापुढे आणि चाळीशीच्या पार म्हणजे तर डोक्यावरुन पाणी. त्यात फुटबॉलसारखा कस घेणारा खेळ असला तर विचारायलाच नको पण इटली आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा गोलरक्षक गिगी बफन वयाची चाळीशी ओलांडली तर मैदानावर तेवढ्याच उत्साहाने गोलपोस्ट राखताना दिसतोय. तो सतत खेळतोय, खेळतोय आणि खेळतोय! त्यामुळे आता त्याच्या 41 वर्षे वयात खेळताना झालंय असं की कधीकाळी तो ज्यांच्यासोबत किंवा विरूद्ध खेळला,  आता त्याच फुटबॉलपटूंच्या मुलांसोबत तो खेळताना दिसतोय.  समोर वडील गेले आणि मुले आली तरी मैदानात बफन कायमच आहे. 

याचे उत्तम उदाहरण म्हणजे शनिवारी लीग वन मध्ये पार पडलेला पॅरिस सेंट-जर्मेनविरुध्द गिनगॅम्प या क्लबदरम्यानचा सामना. या सामन्यासाठी गिनगॅम्पच्या संघात होता 21 वर्षीय स्ट्रायकर मार्कस् थुरम. आता हा थुरम म्हणजे फ्रान्सचा विश्वविजेता फुटबॉलपटू लिलीयन थुरमचा मुलगा. आता यात नवलाची गोष्ट ही की बफन कधीकाळी या लिलीयनसोबतसुध्दा खेळलाय. पर्मा व युव्हेंटस क्लबसाठी बफन व लिलीयन हे टीममेट होते. 1996 ते 2001 पर्यंत ते पर्मा क्लबसाठी आणि 2001 ते 2006 पर्यंत युव्हेंटस क्लबसाठी सोबतच खेळले. पर्माने 1999 मध्ये जिंकलेल्या कोपा इटालिया व युईएफए कपच्या विजयातही ते सोबतच होते. 

लिलीयनचा मुलगा मार्कस् याचा जन्म 1997 मधला.   लिलीयन कधीच निवृत्त झाला असला तरी बफन मात्र खेळतोच आहे आणि शनिवारी तो चक्क लिलीयनचा मुलगा मार्कस् याच्याविरूद्ध गोलपोस्ट राखताना दिसला. साहजिकच मार्कस्साठी हा स्मरणीय क्षण होता म्हणून शनिवारच्या सामन्यानंतर त्याने बफनसोबत जर्सीसुध्दा एक्सचेंज केली. 

लिलीयनप्रमाणेच स्वतःसुध्दा विश्वचषक विजेता असलेल्या बफनसाठी बाप-लेकांसोबत खेळण्याचे हे एकच उदाहरण नाही तर शनिवारच्या या सामन्यासाठी त्याच्याच पॅरिस सेंट जर्मेन संघात होता टिमोथी वी. हा 18 वर्षांचा टिमोथी म्हणजे एकेकाळी बफनविरूद्ध खेळलेला ए.सी. मिलानचा फॉरवर्ड जॉर्ज वी याचा मुलगा. जॉर्ज आता लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत पण नोव्हेंबर 1995 मध्ये 'सेरी ए' स्पर्धेत बुफॉनने पर्मा क्लबतर्फे पदार्पण केले होते त्यावेळी समोरच्या ए.सी. मिलान संघातर्फे जॉर्ज वी खेळले होते. 

याप्रकारे शनिवारी एकाच सामन्यात बफन दोन अशा खेळाडूंसोबत खेळला ज्यांच्या वडिलांसोबत किंवा विरूद्ध सुध्दा तो खेळलाय. आता सहजिकच अशी कारकिर्द असताना बफन 'बुढ्ढा होगा तेरा बाप' असे म्हणत असेल तर यात नवल ते काय! 

कोण आहे बफन? 
बफन हा इटलीचा. गोलरक्षक आणि विश्वविजेता फुटबॉलपटू. जगातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी तो एक मानला जातो. इटलीसाठी तो सर्वाधीक 176 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्यांच्या 2006 च्या विश्वविजयात त्याचे योगदान होते.  28 जानेवारी 1978 ही त्याची जन्मतारीख. व्यावसायीक फुटबॉलपटू म्हणून पर्मा व युव्हेंटस क्लबसाठी खेळल्यानंतर यंदाच तो पॅरिस सेंट जर्मेनकडे आला. यादरम्यान युव्हेंटसकडे वळताना जगातील सर्वात महागडा गोलरक्षक अशी त्याची नोंद झाली. गोल्डन फूट अवार्ड जिंकणारा तो पहिलाच गोलरक्षक. 1995 ते 2001 दरम्यान तो पर्मा क्लबसाठी (168 सामने), 2001 ते 18 दरम्यान युव्हेंटस क्लबसाठी (509 सामने) आणि आता यंदापासून पॅरिस सेंट जर्मेन क्लबसाठी  खेळतोय.

Web Title: footballer buffun play with father and son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.