Inspiration : 4 वर्षांच्या मुलाची कोरोनावर मात; इंग्लंडच्या कर्णधारानं पाठवला Special message
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 04:14 PM2020-04-18T16:14:11+5:302020-04-18T16:16:31+5:30
या नैराश्याच्या वातावरणात इंग्लंडमध्ये एक प्रेरणादायी प्रसंग घडला.
कोरोना व्हायरसचे जगभरात आतापर्यंत 22लाख 51, 446 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 54,278 जणांचा मृत्यू झाला असून 5 लाख 71,359 जणं बरी झाली आहेत. ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 8692 रुग्ण झाले आहेत आणि 14,576 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, या नैराश्याच्या वातावरणात इंग्लंडमध्ये एक प्रेरणादायी प्रसंग घडला. चार वर्षांच्या मुलानं कोरोना व्हायरसवर मात केली. या चार वर्षांच्या मुलाला neuroblastoma नावाचा दुर्मिळ कॅन्सर झाला होता, त्यात त्याला कोरोनाची लागण झाली. पण, त्यानं कोरोनावर मात केली. त्याच्या या जिद्दीचं इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार हेरी केननं कौतुक केलं.
केननं व्हिडीओ कॉलकरून कौतुक केलं. 26 वर्षीय स्ट्रायकर केननं चार वर्षीय आर्चीसाठी संदेश पाठवला की,'' हाय आर्ची. तुझी तब्येत सुधारल्याचं ऐकून आनंद होत आहे. तू स्ट्राँग बॉय आहेस. डॉक्टर, नर्स आणि तुझ्या पालकांचे ऐक. तुला आणि तुझा जुळा भाऊ हेन्रीला फुटबॉल खेळायला आवडतं, हे मी ऐकलं आहे. खेळणं सुरू ठेव, पण सध्या घरीच राहा. तुला खुप खुप शुभेच्छा.''
आर्चीनं यावेळी टॉदनम हॉटस्पर क्लबची जर्सी घातली होती. त्याच्यासोबत त्याचे वडील सिमॉन, आई हॅरिट आणि भाऊ हेन्री होते. केनच्या मॅसेजनं त्यांनाही आनंद झाला. एसेस्क येथील शॅफ्रोन वॉल्डेन येथील हे कुटुंब आहे. कुटुंबीयांनी आर्चीला बरे करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचे आभार मानले.
आर्ची उपचारानंतर घरी परतला. जानेवारी महिन्यात त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर तो खुपच आजारी पडला, त्याला उभही राहता येत नव्हतं. त्याच्या मूत्रपिंड आणि पाठीच्या कण्यात गाठ झाली होती आणि ती शरिरात पसरत चालली होती. त्यात ताला कोरोनाची लागण झाली. त्या संकटावर आर्चीनं मात केली.