फ्रान्स आणि इंग्लंडचे पारडे जड, पण...?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:06 AM2018-07-10T05:06:27+5:302018-07-10T05:06:45+5:30

फ्रान्स व इंग्लंड या जागतिक महासत्तांमध्ये फुटबॉल विश्वामधील सार्वभौमत्वाची लढाई होण्याची दाट शक्यता दिसत आहे. या दोघांकडे बेल्जियम व क्रोएशियाला रोण्याची क्षमता आहे.

 France and England are very heavy, but ...? | फ्रान्स आणि इंग्लंडचे पारडे जड, पण...?

फ्रान्स आणि इंग्लंडचे पारडे जड, पण...?

Next

- रणजीत दळवी

फ्रान्स व इंग्लंड या जागतिक महासत्तांमध्ये फुटबॉल विश्वामधील सार्वभौमत्वाची लढाई होण्याची दाट शक्यता दिसत आहे. या दोघांकडे बेल्जियम व क्रोएशियाला रोण्याची क्षमता आहे. फ्रान्सची या स्पर्धेतील प्रगती तशी सहज, तर इंग्लंडनेही फारसा त्रास न होता येथवर कूच केली आहे.
फ्रान्सने साखळीत फारसा घाम गाळला नाही; पण त्यानंतर मातब्बर अशा अर्जेंटिना व उरुग्वेचा त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने पराभव करत उत्तम प्रदर्शन केले. इंग्लंडसमोरचे ट्युनिशियाचे आव्हान सुमार आणि नवोदित पनामाचे अतिशय कमजोर होते. त्यांची बेल्जियमशी झालेली लढत एक फार्स ठरला. ती लढत त्यांनी जाणूनबुजून हरून स्पर्धेमधील सोपा मार्ग तर नाही ना पसंत केला?
पण, उपांत्य फेरीत नेमके काय होईल? फ्रान्स व इंग्लंडसमोरची आव्हाने कोणती? बेल्जियम प्रबळ प्रतिस्पर्धी आहे. डावपेच आखणारे विशारद राबर्टो मार्टिनेझ काय करतील? याचा अंदाज बांधणे महाकठीण. आपल्या संघाची व्यूहरचना बदलण्याबरोबर ते नेमके कोणाला कोठे व कसे खेळवतील, हे मैदानावर समजेल. त्यांच्यापाशी खेळाडूंचा फौैजफाटाही असा आहे, की त्यांचा इतरांना हेवा वाटावा. ईडन हॅ झार्ड, रोमेलू लुकाकू ही आघाडीची भेदक जोडगोळी त्यांना मध्य क्षेत्रात भक्कम रसद पुरविणारे डे ब्रुइन, मॉरोअने फेलायनी, अ‍ॅक्सल व्हिटसेल व बचावफळीला भक्कमपणा देणारे व्हिन्सेंट कोम्पनी आणि अ‍ॅल्डरवीरल्ड यांचा अडथळा पार करावा तर पुढ्यात थिवाँ कुर्तोआ हा अभेद्य गोलबुरूज!
मार्टिनेझ यांची एक डोकेदुखी मात्र आहे. थॉमस मेयुनिअर दोन पिवळ्या कार्डांमुळे खेळू शकणार नाही. त्यांची दुसरी अडचण आहे जपान व ब्राझीलविरुद्धच्या लढतीत खेळाडूंना प्रमाणाबाहेर करावे लागलेले श्रम आणि त्यापासून निर्माण झालेला प्रचंड ताणतणाव व मानसिक थकवा. फ्रान्सला याचा लाभ उठवता येतो का, यावर या लढतीचे भवितव्य अवलंबून राहील.
फ्रान्सची अजून तरी कोणीही सत्त्वपरीक्षा घेतलेली नाही. त्यांची सर्वोत्तम कामगिरी होणे बाकी आहे. त्यांनी अजून शिखर गाठलेले नाही.
कर्णधार आणि गोलरक्षक ह्युगो लॉरिसने आपल्या अनुभवाच्या बळावर बचावफळीला मार्ग दाखवायचा आहे. सॅम्युएल उमटिटी व राफाएल व्हराने ही काहीशी अननुभवी जोडी आता स्थिर झाल्याचे दिसत आहे. मध्य क्षेत्रात या दोघांच्या किंचित पुढे खेळणारा एन्गोलो कॉन्टेचे कौशल्यपूर्ण पासेसही महत्त्वाचे ठरू शकतील. तसे झाले तर फ्रान्सकडे हुकमाचे पत्ते राहतील.
कायलियन एमबाप्पेवर अपेक्षांचे ओझे आहे. त्याला प्रतिस्पर्धी बचावाने बांधलेले साखळदंड तोडावे लागतील. त्याला आॅलिव्हिएर जिरूडकडून अजून अपेक्षित साथ लाभलेली नाही. एका सामान्यासाठी निलंबित बुझ मॅटुइडी आता उपलब्ध असल्याने डिडिएर डिशाँ त्याच्यासह काय डावपेच आखतात ते पाहावे लागेल.
माझा संघ अननुभवी असून त्याच्या बांधणीचे काम अपूर्ण असल्याचे इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट यांनी म्हटले असले, तरी क्रोएशियाला रोखण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांना पूर्ण करायचे आहे. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना दोन लढतींमध्ये ज्यादा वेळ आणि शूटआउटला सामोरे जावे लागल्याने जणू एक सामना अधिक खेळावा लागला.

क्रोएशियाकडे गोल स्कोअररची उणीव आहे. मॉड्रिक, रॅकिटिच, कोव्हासिच व पेरीसिच यांना जबाबदारी उचलावी लागेल. इंग्लंडचा गोरलक्षक जॉर्डन पिकफर्ड चांगल्या फॉर्ममध्ये आहे. व्हेद्रान कॉर्ल्युव्हा व डॉमागोझ व्हिडा यांच्यावर रहीम स्टर्लिंगला रोखण्याची जबाबदारी आहे. पण, हॅरी केन चोरपावलांनी शिरून गोल करणार नाही, यासाठी सर्वांनाच दक्ष राहावे लागेल.

Web Title:  France and England are very heavy, but ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.