विजेतेपद फ्रान्सच्या दृष्टीपथात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:36 AM2018-07-12T05:36:36+5:302018-07-12T05:37:05+5:30

विश्वविजेते होण्याच्या आपल्या ध्येयापासून फ्रान्स केवळ एकच पाऊल दूर आहे. बेल्जियमसारख्या तगड्या संघाला पराभूत करण्यासाठी आवश्यक डावपेच आखणारे डिडिएर डिशाँ हेदेखील एक विश्वविजयी खेळाडू आणि प्रशिक्षक असा दुहेरी बहुमान प्राप्त करू शकतात.

France in Fifa world cup News | विजेतेपद फ्रान्सच्या दृष्टीपथात...

विजेतेपद फ्रान्सच्या दृष्टीपथात...

Next

- रणजीत दळवी

विश्वविजेते होण्याच्या आपल्या ध्येयापासून फ्रान्स केवळ एकच पाऊल दूर आहे. बेल्जियमसारख्या तगड्या संघाला पराभूत करण्यासाठी आवश्यक डावपेच आखणारे डिडिएर डिशाँ हेदेखील एक विश्वविजयी खेळाडू आणि प्रशिक्षक असा दुहेरी बहुमान प्राप्त करू शकतात. याआधी ब्राझीलचे मारिओ झगालो आणि जर्मनीचे फ्रान्स बेकेनबॉअर यांनी असे यश संपादन केले होते. डिशाँ त्यात यशस्वी होतील की कसे, हे यथावकाश समजलेच; पण या स्पर्धेतील सर्वात मोठे निपुण रॉबर्टाे मार्टिनेस यांच्यावर डाव उलटविण्यात ते यशस्वी झाले. त्यांचे युद्धशास्त्र ते कसेही असो, निर्णायक ठरले!
ही लढत फ्रान्सने तशी आरामात जिंकावयास हवी होती. कायलियन एमबाप्पेने आपल्या कलात्मक खेळ आणि चलाखीद्वारे ज्या संधी उपलब्ध केल्या होत्या. त्यापैकी एखादी तरी आॅलिव्हिएर जिरूडने सत्कारणी लावणे आवश्यक होते. शेवटी, एका सेट-पीस वर लढतीचा निकाल लागला असला, तरी आक्रमण आणि बचाव यांचा उत्तम मिलाफ साधणाऱ्या फ्रान्सचे कौतुक होणे गरजेचे आहे. या सामन्यात खरा संघर्ष मध्यक्षेत्रातच वर्चस्वासाठी झाला. त्यामुळे अधिक गोल झाले नाहीत, हे स्वाभाविकच.
बेल्जियमच्या आक्रमणांमध्ये तशी धार कमी असली, तरी त्यांनी सुरुवातीला जोमाने हल्ले केले. रोमेलू लुकाकुची साधी लुकलूकही पाहावयास मिळाली नाही व आक्रमणाची जबाबदारी असणारा विंग बॅक नासर चॅडली अपेक्षित प्रभाव पाडू शकला नाही; मात्र ईडन हॅझार्ड आणि केव्हिन डे ब्रुश्न आणि मध्यक्षेत्रात मुक्तपणे वावरण्याची मुभा असणारा मॉरोअने फेलायनी यांचे काही हल्ले चांगलेच धोकादायक ठरले. फ्रान्सने ते कसेबसे थोपविले.
प्रथम हॅझार्ड आणि डे ब्रुइन यांनी उत्तम समन्वय साधला; मात्र हॅझार्डचा फटका गोलमुखासमोरून बाहेर गेला. जेव्हा हॅझार्डने पुन्हा जोरदार फटका घेतला, तेव्हा फ्रेंच बचावपटू राफाएल व्हरानने तो निष्फळ ठरविला. त्या चेंडूसाठी फेलायनीही झेपावला होता; पण व्हरान नशिबवान ठरला. यानंतरचा टोबी अ‍ॅल्डरविरल्डचा अर्धा टर्न मारून घेतलेला फटका फ्रेंच कर्णधार ह्युगो लॉरिसने उजवीकडे झेपावत रोखला नसता, तर आपत्ती ओढवलीच होती!
हा दिवस व्हरानचा तसेच सॅम्युएल उमटीटीचा होता. व्हरानने डे ब्रुइनच्या क्रॉसची बदललेली दिशा असो की त्यांनी उत्तरार्धात ड्राइस मर्टेन्सचे उजवीकडून आलेल्या पासेसना विफल ठरविण्यात प्राप्त केलेले यश, या दोघांनी बेल्जियमच्या फॉरवर्डस्ना समोरून गोलहल्ले करू दिले नाहीत. तिथेच त्यांनी मुख्य लढाई जिंकली.
बेल्जियमवरही एकदा संकट ओढवले होते. एमबाप्पेचा थ्रू पास अचूक होता व त्यावर पाव्हार्ड उजवीकडून आत घुसला. तो उजवीकडे चेंडू ‘प्लेस’ करेल असे थिबॉ कुर्ताेआचे पूर्वानुमान; पण त्याने केला उलट बाजूला. सुदैवाने उंचपुºया थिबॉचा उजवा पाय तो शॉट विफल करून गेला. हे झाले मध्यंतराआधी. शेवटी तो निर्णायक गोल ५४व्या मिनिटाला झाला. अंतोआँ ग्रिझमनचा कॉर्नर केवढा अचूक! त्या इनस्विंगवर चेंडूला फक्त डोके लावण्याचे काम उमटीटीने केले. हा त्याच्या आयुष्यातला अनमोल गोल ठरावा.
फ्रान्सने मध्यक्षेत्रात एवढी नाकेबंदी केली की, त्यामुळे केवळ एकदाच त्यांच्यावर हल्ला झाला. मर्टन्सचा अचूक क्रॉस, तोही पेनल्टी स्पॉटजवळ; पण फेलायनीचा हेडर, जी त्याची खासियत, चेंडू किंचित बाहेर आणि फ्रान्स सुरक्षित! पॉल पॉग्बाने संघाच्या हितासाठी आक्रमक वृत्तीला आवर घालताना फेलायनीला रोखण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली. मध्यक्षेत्रातील इटुकला एनगोलो काँटे आणि मेहनती ब्लेझ मॅटुइडी यांनी जबरदस्त खेळ केला. काँटे सर्वांच्या मार्गात अडथळा आणत गेला, तर मॅटुइडी सतत आघाडीच्या फळीला थ्रू पासेस करत राहिला.

मार्टिनेझनी आपल्या चुका सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मुसा डेम्बेलेला एमबाप्पेवर ‘मार्कर’ म्हणून लावणे हा डाव फसला तसाच यॅनिक कॅरास्सोला फेलायनीच्या जागी उत्तरार्धात आणण्याचा मिची बात्शुयीला ‘स्टॉपेज टाईम’मध्ये चॅडलीऐवजी उतरविणे त्यांच्या हताशपणाचे प्रतीक ठरले!

Web Title: France in Fifa world cup News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.