फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भेटले 'बिछडे यार'!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 12:18 PM2018-06-17T12:18:17+5:302018-06-17T12:18:17+5:30
कुंभमेळ्यात हरवलेल्या भावंडांना तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं असेल. पण सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कुंभमेळ्यात मात्र एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची पुन्हा एकदा भेट घडून आली आहे.
मॉस्को - कुंभमेळ्यात हरवलेल्या भावंडांना तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं असेल. पण सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कुंभमेळ्यात मात्र एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची पुन्हा एकदा भेट घडून आली आहे. शाळा, कॉलेजमध्ये घट्ट मैत्री असलेले मित्र-मैत्रिणी संपर्कात राहण्याची आणि नियमित भेटीगाठी घेण्याची वचने एकमेकांना देतात. पण करिअर तसेच इतर कारणांमुळे अशा मित्र-मैत्रिणींची वर्षांनुवर्षे भेट होऊ शकत नाही. अशाच एकत्र शिक्षण घेतलेल्या पण वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेल्या चार मित्र-मैत्रिणींची सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भेट घडून आली आहे.
मुंबईत राहणारा अनुराग भिडे, लग्न करून सिंगापूरमध्ये स्थायिक झालेले संकेशा आणि सुयश तसेच जर्मनीमध्ये स्थायिक झालेला उदित मंगल हे चार आयआयटीयन्स फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. आयआयटी मुंबईत शिकत असताना या चार जणांनी अन्य काही मित्र-मैत्रिणींसोबत 2014 साली ब्राझीलमध्ये होणारी फिफा विश्वचषक स्पर्धा एकत्र पाहण्याचे ठरवले होते. पण 2013 साली ते आयआयटीमधून उत्तीर्ण झाले आणि लगेच नोकरीही मिळाल्याने करिअरची घडी बसवण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. नवी नोकरी आणि हातात पुरेसा पैसा नसल्याने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा एकत्र आनंद घेण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.
पण रशियात होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने या मित्र परिवारासमोर फुटबॉल विश्वचषक स्पर्धा एकत्र पाहण्याची संधी चालून आली. मग काय, या सात जणांपैकी चार जणांनी थेट रशिया गाठले आणि सोची येथे झालेल्या पोर्तुगाल आणि स्पेनमधील एकत्र पाहिली.