जर्मन पोहचले उपांत्यपूर्व फेरीत, १७ वर्षाआतील विश्वचषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:04 AM2017-10-17T02:04:15+5:302017-10-17T02:04:39+5:30
जर्मनीचा कर्णधार फिते आर्प याने केलेल्या दोन गोलच्या मदतीने आज जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाला ४-० ने पराभूत केले.
नवी दिल्ली : जर्मनीचा कर्णधार फिते आर्प याने केलेल्या दोन गोलच्या मदतीने आज जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाला ४-० ने पराभूत केले. जर्मन संघाने कोलंबियाच्या बचाव फळीतील उणिवांचा फायदा घेत त्यांना युरोपियन फुटबॉलच्या कौशल्याचे प्रदर्शन घडवले.
साखळी सामन्यात इराणकडून झालेल्या मोठ्या उलटफेरानंतर जर्मनीच्या संघाने दमदार खेळ केला. लॅटिन अमेरिकन संघ कोलंबिया या सामन्यात झुंजताना दिला. त्यांनी काही वेळा चांगल्या चाली रचल्या आणि गोलपोस्टवर हल्ले केले. मात्र त्यांना एकही गोल करण्यात यश आले नाही. दहाव्यांदा या स्पर्धेत खेळणा-या जर्मनीसाठी कर्णधार जॉन फिते आर्प याने सातव्या आणि ६५ व्या मिनिटाला दोन गोल केले. त्यासोबतच त्याचे या स्पर्धेत चार गोल झाले. यान बिसेक याने ३९ व्या, तर जॉन येबोआ याने ४९ व्या मिनिटाला गोल केले.
आर्प याने सातव्या मिनिटालाच कोलंबियाचा गोलकीपर केवीन मीर याच्या चुकीचा फायदा घेतला. त्याने गोल करत १-० ने आघाडी घेतली. मिडफिल्डर जॉन येबेओने कोलंबियाच्या डिफेंडरला चकवा देत आर्पला पास दिला. आर्पने थेट गोलपोस्टमध्ये बॉल मारला.
त्यानंतर जर्मन संघ थोडा सुस्त वाटला. कोलंबियाच्या संघाने ३० व्या मिनिटाला बरोबरीचे दोन चांगले प्रयत्न केले. मात्र थोड्याच वेळात जर्मन संघाने पुन्हा एकदा कोलंबियाच्या गोलपोस्टवर हल्ला चढवला. तीन मिनिटांनी येबोआचा शानदार शॉट गोलपोस्टबाहेरच राहिला. अन्यथा जर्मन संघाची आघाडी दुप्पट झाली असती. मात्र ३९ व्या मिनिटाला यान बिसेक याने कॉर्नर शॉटवर संघासाठी हेडरद्वारे गोल नोंदवला. दुस-या हाफमध्ये जर्मनीने मैदानात येताच आक्रमकता दाखवली. कर्णधार कॉर्प याने ४९ व्या मिनिटाला येबेआकडे पास दिला.
त्याने थेट गोल करत आघाडी ३-० अशी वाढवली. कर्णधार आर्प याने ६५ व्या मिनिटाला संघाकडून चौथा आणि आपला दुसरा गोल केला. त्यानंतर जेंसी नगानकाम याला मैदानात उतरवण्यात आले.
(वृत्तसंस्था)
चार वेळा फिफा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचलेल्या जर्मनीला यानिक केटेल याच्या दुखापतीमुळे धक्का बसला. मात्र त्यांनी जोशा वागनोमान याला मैदानात उतरवले. जर्मनीचा संघा ३२ वर्षांपूर्वी स्पर्धेत उपविजेता राहिला आहे. तर कोलंबियाचा संघ सहाव्यांदा या स्पर्धेत खेळत आहे. मात्र त्यांना आपल्या ख्यातीनुसार खेळ करता आलेला नाही.
जर्मन संघाने केलेले गोल
७ वा मिनिट जॉन फिते आर्प
३९ वा मिनिट यान बिसेक
४९ वा मिनिट जॉन येबेआ
६५ वा मिनिट जॉन फिते आर्प