EURO 2020 : जर्मनीविरुद्धच्या सामन्यात सहकाऱ्यांनीच दिला ख्रिस्तियानो रोनाल्डोला दगा; पोर्तुगालचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 04:09 PM2021-06-20T16:09:50+5:302021-06-20T16:10:09+5:30
यूरो फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या पोर्तुगाल संघाला शनिवारी धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
यूरो फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या पोर्तुगाल संघाला शनिवारी धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पोर्तुगाल संघाला जर्मनीकडून 2-4 अशी हार पत्करावी लागली. जर्मनीला विजयासाठी पोर्तुगालच्याच खेळाडूंनी मदत केल्यानं रोनाल्डोला मोठा धक्का बसला. रॉबिन गोसेन्स आणि काय हव्हर्ट्ज यांनी गोल करून जर्मनीचा 4-2 असा विजय पक्का केला.
ख्रिस्तियानो रोनाल्डो व डिओगो जोटा यांनी पोर्तुगालसाठी गोल केले, परंतु दोन रुबेन डायस व राफेल गुरेईरो यांच्यामुळे जर्मनीच्याच गोलजाळीत चूकून चेंडू गेला. त्या दोन स्वयंगोलमुळे पोर्तुगाल संघाला 2-4 असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात जर्मनीनं दणक्यात सुरूवात केली होती. गोसेन्स यानं पाचव्या मिनिटाला गोल केला, परंतु VAR रिव्ह्यूत तो ऑफसाईड असल्याचे दिसले अन् तो गोल नाकारण्यात आला. दहा मिनिटांनंतर रोनाल्डोनं पोर्तुगालचे खाते उघडले. या गोलसह रोनाल्डोनं सर्वाधिक 109 आंतरराष्ट्रीय गोल असलेल्या इराणच्या अली डाईल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
पण, 35 व 39 मिनिटांच्या या कालावधीत पोर्तुगालच्या खेळाडूंनी जर्मनीला दोन गोल भेट म्हणून दिले अन् जर्मनीनं पहिल्या हाफमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. 51व्या मिनिटाला कायनं व 60व्या मिनिटाला रॉबिननं जर्मनीची आघाडी 4-1 अशी मजबूत केली. 67व्या मिनिटाला जोटानं गोल करून पोर्तुगालला दिलासा दिला, परंतु पोर्तुगालला पराभव टाळता आला नाही. F गटात जर्मनी व पोर्तुगाल प्रत्येकी 3 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फ्रान्स 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आता पोर्तुगालला अखेरच्या साखळी सामन्यात फ्रान्सवर विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे.