जर्मनीचा गिनीवर ३-१ दणदणीत विजय, आता कोलंबियाविरुद्ध होणार लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 09:16 PM2017-10-13T21:16:47+5:302017-10-13T21:17:11+5:30
युरोपियन पॉवर हाऊस जर्मनीने आधीच्या लढतीतील पराभवानंतर जोरदार मुसंडी मारताना आज येथे आफ्रिकन संघ गिनीवर ३-१ अशी मात करताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.
कोच्ची : युरोपियन पॉवर हाऊस जर्मनीने आधीच्या लढतीतील पराभवानंतर जोरदार मुसंडी मारताना आज येथे आफ्रिकन संघ गिनीवर ३-१ अशी मात करताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.
येथे जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या क गटाच्या सामन्यात जर्मनीकडून जॉन फिटे आर्प याने आठव्या मिनिटाला, निकालेस कुएन याने ६२ व्या मिनिटाला आणि साहवर्दी सेटिन याने ९२ व्या मिनिटाला गोल केला, तर इब्राहिमा सौमाह याने गिनी संघासाठी एकमेव गोल २६ मिनिटाला केला.
जर्मनीला याआधीच्या सामन्यात 0-४ ने पराभव पत्करावा लागला होता. आता ते सहा गुणांसह दुसºया स्थानावर असून, त्यांनी अंतिम १६ संघातील स्थान पक्के केले. आता ते १६ आॅक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे अ गटातील दुसºया स्थानावर असणाºया कोलंबियाविरुद्ध खेळतील.
इराणने आज गोवा येथे अन्य एका गटातील सामन्यात कोस्टारिकाचा ३-0 असा पराभव केला. ते या गटातील सर्व सामने जिंकताना ९ गुणांसह अव्वल स्थानावर राहिले. गिनी आणि कोस्टा रिका यांचे प्रत्येकी १ गुण झाले असून, त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
गिनी संघाने सुरुवातीला चेंडूंवर ५५ टक्के नियंत्रण ठेवले होते आणि त्यांनी जास्त शॉटही मारले; परंतु ते लक्ष्यापासून खूप दूर होते. जर्मनीने गिनीच्या गोलपोस्टवर १७ वेळेस हल्ला केला; परंतु त्यातील आठ हल्ले लक्ष्याकडे होते.
हॅम्बुर्गसाठी बुंदेसलीगात नुकतेच पदार्पण करणारा जर्मनीचा कर्णधार आर्प याने आपल्या संघाला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. त्याने गिनीचा डिफेंडरच्या चुकीचा फायदा घेत व गोलरक्षकाला चकवताना गोल केला. तथापि, गिनीने २६ व्या मिनिटाला बरोबरी साधली. सौमाह याने डाव्या पायाने मारलेल्या शॉटवर गोल केला. जर्मनीने पहिल्या सत्राअखेर आघाडी घेण्याचा प्रयत्न केला; परंतु गिनीचा गोलकीपरने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.
४२ व्या मिनिटाला इलियास अबोयुचाबाकाचा गोल करण्याचा प्रयत्न गिनीचा गोलरक्षक मोहम्मद कामारा याने हाणून पाडला. पूर्वार्धात इंज्युरी टाइममध्ये गिनीजवळ आघाडी घेण्याची संधी होती; परंतु एगुईबोरा कामाराचा गोल करण्याचा प्रयत्न जर्मनीचा गोलकीपर लुका प्लोगमान याने अयशस्वी ठरवला.
उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल करण्याची संधी मिळाली. तथापि, जर्मनीने ६२ व्या मिनिटाला आघाडी घेतली. त्यानंतर साहवेर्द सेटिन याने अतिरिक्त वेळेत मिळालेल्या पेनल्टची गोलमध्ये रूपांतर करीत विजयाचे अंतर वाढवले.