जागतिक थराराला झाली सुरुवात, रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी केले जगाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:20 AM2018-06-15T02:20:02+5:302018-06-15T02:20:02+5:30
सुमारे ८० हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत लुझनिकी स्टेडियममध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन यांनी विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन केले आणि त्यानंतर यजमान रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याने जागतिक महासंग्रामाला सुरुवात झाली.
मॉस्को : सुमारे ८० हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत लुझनिकी स्टेडियममध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन यांनी विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन केले आणि त्यानंतर यजमान रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याने जागतिक महासंग्रामाला सुरुवात झाली. महिनाभर रंगणाऱ्या या रोमांचक स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावण्यासाठी ३२ देश एकमेकांविरुद्ध भिडतील.
राष्ट्रपती पुतिन यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘मी सर्वांना जगातील या सर्वात महत्त्वाच्या अजिंक्यपद स्पर्धेच्या सुरुवातीला शुभेच्छा देतो.’ रशियामध्ये १९८० साली झालेल्या मॉस्को आॅलिम्पिकनंतर पहिल्यांदा जागतिक स्तराच्या स्पर्धेचे दिमाखदार आयोजन होत आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनावर रशियाने तब्बल १३ अरब डॉलर खर्च केले आहेत.
सलामीच्या सामन्याआधी झळाळता विश्वचषक सर्वांपुढे आणला गेला आणि यावेळी संपूर्ण स्टेडियम दणाणून गेले. स्पेनचा माजी गोलरक्षक इकेर सेसिलास याने हा चषक पकडला होता. ज्यावेळी सेसिलासने हा चषक मैदानावर आणला तेव्हा खचाखचा भरलेल्या स्टेडियमने जोरदार टाळ्यांनी चषकाचे स्वागत केले. यानंतर विविध रंगांनी नटलेल्या कलाकारांच्या उपस्थितीने स्टेडियमचे वातावरण अधिक खुलले. त्याचवेळी विविध रंगाचे कपडे परिधान केलेल्या आणि चेहरे रंगवलेल्या फुटबॉलप्रेमींचा उत्साहही शिगेला पोहचला होता.
उद्घाटन समारंभ दणक्यात झाला. ब्रिटनचा पॉप स्टार रॉबी विलियम्सने धमाकेदार सादरीकरण करत सोहळ्यात रंगत आणली. रशियाचा संगीतकार प्योत्र चाइकोवस्कीने संगीतबद्ध केलेली धुन सुरु होताच ‘रशिया.. रशिया’ असा जयघोष झाला. राष्ट्रपती पुतिन आणि फिफा प्रमुख जियानी इन्फेन्टिनो यांनी यानंतर स्पर्धा सुरुवातीची औपचारीक घोषणा केली.
रशियात तिकिटांचा काळाबाजार
मॉस्को : तिकिटांच्या अवैध विक्रीवर रशियातील आयोजक आणि फिफाने कारवाई केल्याचा दावा करण्यात येत असला तरी विश्वचषकात तिकिटांचा काळबाजार सुरूच आहे.
मॉस्कोतील मुख्य तिकीट कार्यालयाबाहेर अव्वाच्या सव्वा रकमेत तिकीट विक्री करणारे आढळून येतात. एका पत्रकाराला तासाभरात सहावेळा तिकीट हवे का, अशी विचारणा झाली.
रशिया-सौदी अरब सामन्यातील लग्झरी तिकीट ७०० डॉलरला विकण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या पहिल्या सामन्याची तिकिटे देखील २३०० डॉलरपर्यंत विकली जात आहेत. ही तिकिटे खरी आहे का, याबाबत मात्र शंका व्यक्त होत आहे. अधिकृत तिकीट विक्रेते संकेतस्थळ वियागोगोविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर फिफाने काही तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. रशियात तिकिटांचा काळाबाजार हा गुन्हा असून दोषींकडून तिकिटाच्या मूळ किमतीपेक्षा २५ पट अधिक दंड वसूल केला जातो. (वृत्तसंस्था)
विश्वचषक होणार ‘हायटेक’
नवी दिल्ली : प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत सुधारणा करण्याच्या हेतूने विविध नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येतो. अशाच काही नव्या तंत्रज्ञानाचा वापर रशियात होत असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यानही पाहावयास मिळणार आहे. व्हीएआर (व्हिडीओ असिस्टंट रेफ्री), ४के अल्ट्रा हायडेफिनेशन व्हिडीओ आणि व्हीआर, इलेक्ट्रॉनिक परफॉर्मन्स आणि ट्रॅकिंग सिस्टम (ईपीटीएस), ५जी आणि टेलीस्टार १८ फुटबॉल हे पाच प्रकारचे नवे तंत्रज्ञान यंदाच्या विश्वचषकामध्ये वापरण्यात येईल.
रेफ्री व्हीएआर तंत्राद्वारे गोल, पेनल्टी, रेड कार्ड आणि चुकीच्या खेळाडूच्या ओळखीसंबंधी व्हिडीओ, रेफ्रीला रेफर करू शकतो ज्याची रेफ्रीला मदत होईल. विशेष म्हणजे एफए कपसारख्या अनेक स्पर्धांमध्ये या तंत्राचा याआधी वापर करण्यात आला आहे. स्पर्धेतील सर्व ६४ सामन्यांमध्ये या तंत्राचा वापर होणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले आहे.