गोव्यात ब्राझीलला पसंती! रंगणार ब्राझील-नायझेर सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:33 AM2017-10-12T00:33:36+5:302017-10-12T00:33:56+5:30
गोव्याप्रमाणेच ब्राझीलवरही पोर्तुगीजांनी राज्य केले. ब्राझील आणि गोवा या दोघांच्या संस्कृतीत बरीच समानता पाहायला मिळते. गोव्यात फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.
सचिन कोरडे
गोवा : गोव्याप्रमाणेच ब्राझीलवरही पोर्तुगीजांनी राज्य केले. ब्राझील आणि गोवा या दोघांच्या संस्कृतीत बरीच समानता पाहायला मिळते. गोव्यात फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे ब्राझील आणि फुटबॉल या दोन्ही गोष्टींचा गोमंतकीयांवर बराच प्रभाव आहे.
अशातच आपल्या आवडत्या संघाचा खेळ पाहण्याची संधी मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळे. १७ वर्षांखालील विश्वचषकाच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे. ब्राझीलकडे प्रबळ दावेदार म्हणूनही पाहिले जात आहे. येत्या १३ आॅक्टोबर रोजी गोेव्यात ब्राझील-नायझेर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी हे दोन्ही संघ बुधवारी गोव्यात दाखल झाले. ब्राझील संघ जेव्हा विमानतळाबाहेर पडला तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो चाहते उपस्थित होते. पोर्तुगीज भाषेत ते जयघोष करीत होते. प्रत्येक खेळाडूला निरखता यावे, यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. जल्लोषी स्वागताने ब्राझीलच्या खेळाडूंनाही मोठा धक्का बसला. त्यांनी गोमंतकीयांना धन्यवाद दिले.
ब्राझील हा गोमंतकीयांच्या सर्वाधिक पसंतीचा संघ आहे.
आतापर्यंतची त्यांची कामगिरी पाहता हा संघ आगेकूच करेल, यात शंका नाही. ब्राझीलने स्पेन आणि उत्तर कोरिया संघांवर मात करीत लीगमधील सामने जिंकत अंतिम १६ साठी पात्रता मिळवली आहे. आपले विजयी अभियान कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
पुणे-कोल्हापूरकरांची गोव्याकडे धाव
महाराष्ट्र आणि गोव्यातही या स्पर्धेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, ब्राझीलच्या सामन्याचे सर्वाधिक आकर्षण पाहायला मिळत आहे. १३ रोजी होणाºया सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली असून ही तिकिटे मिळवण्यासाठी पुणे आणि कोल्हापूर येथील चाहत्यांनी खूप धडपड केली. जवळपास २००० चाहते कोल्हापूर येथून येतील. गोव्याप्रमाणेच ब्राझील संघ हा कोल्हापूरवासीयांचा आवडता संघ आहे. हा सामना पाहण्यासाठी त्यांना फिफा संघटना व गोवा फुटबॉल असोसिएशनने मदत केली आहे. कोल्हापूरच्या चाहत्यांमध्ये स्थानिक युवा फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचा समावेश असल्याचे कोल्हापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र दळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.