जपानविरुद्धचा गोल प्रेरणादायी : फर्नांडिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 04:07 AM2018-08-05T04:07:51+5:302018-08-05T04:08:17+5:30
भारताला पाचव्या ‘डब्ल्यूएएफएफ १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत जपानकडून २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला.
अम्मान : भारताला पाचव्या ‘डब्ल्यूएएफएफ १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत जपानकडून २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, भारताच्या १६ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला. ते म्हणाले, जपानविरुद्ध एक गोल करणे हे आमच्यासाठी प्रेरणादायी होते. या कामगिरीने केवळ संघाचे मनोबल वाढणार नाही, तर समर्थक आणि हितधारकांमध्येही विश्वास निर्माण होईल की आम्ही चांगले खेळू शकतो. जपानसारख्या संघाविरुद्ध गोल नोंदवून आघाडी मिळवून संतोषजनक असते. आमचा आत्मविश्वास सुरुवातीपासून वाढलेला होता. जेव्हा टीमने आघाडी मिळवली होती तेव्हा बाहेर बसलेले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ खूप उत्सुक होते.
दरम्यान, दोन्ही संघांदरम्यान अशा स्तरावरचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात भारताच्या विक्रम प्रताप सिंहने २६ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली होती. पहिल्या हाफपर्यंत ही आघाडी कायम होती. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये सात मिनिटांच्या आतच जपानने दोन गोल नोंदवले. कुराबा कोंदोने ५७ व्या आणि शोजी तोयामी याने ६४ व्या मिनिटाला गोल नोंदवला होता.