युव्हेंटसला 'अच्छे दिन'; रोनाल्डोपाठोपाठ आणखी एक फुटबॉल स्टार ताफ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:49 AM2018-07-18T11:49:48+5:302018-07-18T11:50:16+5:30
रेयाल माद्रिद क्लबसोबतचा नऊ वर्षांचा सुखी प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंटसची निवड का केली, हा प्रश्न अजूनही बुचकळ्यात टाकत असताना आणखी एक स्टार या क्लबच्या वाटेवर आहे.
मुंबई - रेयाल माद्रिद क्लबसोबतचा नऊ वर्षांचा सुखी प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंटसची निवड का केली, हा प्रश्न अजूनही बुचकळ्यात टाकत असताना आणखी एक स्टार या क्लबच्या वाटेवर आहे. रेयाल माद्रिदशी जोडलेला हा स्टार रोनाल्डोपाठोपाठ युव्हेंटसच्या ताफ्यात येत असल्याने इटालियन क्लबला अच्छे दिन आले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रेयालचे माजी प्रशिक्षक झिनेदिन झिदान युव्हेंटसच्या क्रीडा अधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा झिदान-रोनाल्डो या जोडीला एकत्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
BREAKING: Zinedine Zidane will join Juventus in October as Sports director of the club. pic.twitter.com/Un5wBSY3BE
— Football Hub (@FootbalIhub) July 17, 2018
रेयाल माद्रिद क्लबला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद जिंकून दिल्यानंतर झिदान यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विश्वचषक स्पर्धा संपताच माद्रिदचा प्रमुख खेळाडू रोनाल्डोनेही क्लबला सोडचिठ्ठी दिली. रोनाल्डोने युव्हेंटसची निवड केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. युव्हेंटसच्या क्रीडा अधिकारी म्हणून झिदान यांची नियुक्ती होणार असल्याच्या वृत्ताने त्यात अधिक भर घातली. 17 वर्षांनंतर झिदान तुरीनच्या या क्लबमध्ये दाखल होणार आहेत. 1996 ते 2001 या कालावधीत झिदान यांनी खेळाडू म्हणून क्लबचे प्रतिनिधित्व केले होते.