होंडुरासने पाडला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इराकने चिलीचा ३-० असा धुव्वा उडवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:26 AM2017-10-12T00:26:48+5:302017-10-12T00:30:05+5:30
अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात होंडुरासने ‘ई’ गटात दणदणीत विजयाची नोंद करताना न्यू कॅलेडोनियाचा ५-० असा फडशा पाडला.
गुवाहाटी : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात होंडुरासने ‘ई’ गटात दणदणीत विजयाची नोंद करताना न्यू कॅलेडोनियाचा ५-० असा फडशा पाडला. यासह होंडुरासने बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तसेच, अन्य सामन्यात ‘फ’ गटात इराकने चिलीचे कडवे आव्हाना ३-० असे परतावून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.
गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात होंडुरासकडून कार्लोस मेजियाने २५व्या आणि ४२व्या मिनिटाला शानदार गोल केले. तसेच, पॅट्रिक पालसियोस याने ५१व्या आणि ८८व्या मिनिटाला गोल करुन न्यू कॅलेडोनियाच्या बचावाला खिंडार पाडले. या दोघांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर होंडुरासने दणदणीत विजय निश्चित केला. दरम्यान, जोशुआ कनालेस यानेही २७व्या मिनिटाला एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. न्यू कॅलेडोनियाला यासह स्पर्धेत सलग दुसºयांदा मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले.
दुसरीकडे कोलकाताच्या विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर इराकने चिलीचा ३-० असा धुव्वा उडवला. दाऊदने सहाव्याच मिनिटाला केलेल्या वेगवान गोलमुळे इराकचा आत्मविश्वास दुणावला. यानंतर, पुन्हा एकदा दाऊदने ६८व्या मिनीटाला फ्री किकवर गोल करुन संघाला २-० असे आघाडीवर नेले. इराकच्या धडाक्यापुढे दडपणाखाली आलेल्या चिलीकडून अनेक चुकाही झाल्या. त्यात, ८१व्या मिनिटाला चिलीच्या दिएगो वेलेंसियाकडून स्वयंगोल झाल्याने इराकच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब झाले. (वृत्तसंस्था)