क्रोएशियाकडून १९९६ पेक्षा सरस कामगिरीची राकितिकला आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:18 AM2018-07-09T04:18:33+5:302018-07-09T04:18:44+5:30
क्रोएशिया १९९८ विश्वकप स्पर्धेनंतर यावेळी फुटबॉल विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्यानंतर खेळाडू इव्हान राकितिकला गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी संघाची कामगिरी आणखी सरस ठरण्याची आशा आहे.
सोची - क्रोएशिया १९९८ विश्वकप स्पर्धेनंतर यावेळी फुटबॉल विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्यानंतर खेळाडू इव्हान राकितिकला गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी संघाची कामगिरी आणखी सरस ठरण्याची आशा आहे.
क्रोएशियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अतिरिक्त वेळेत लढत २-२ ने बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये यजमान रशियाचा ४-३ ने पराभव केला.
बार्सिलोनाचा मिडफिल्डर राकितिक म्हणाला,‘आम्ही बरीच मेहनत घेतली आणि उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्वस्व झोकून दिले. क्रोएशियासारख्या देशासाठी ही मोठी उपलब्ध असून आम्ही आगेकूच करण्यास उत्सुक आहोत.’
राकितिक पुढे म्हणाला,‘आम्ही विजयाचा आनंद घेण्यास इच्छुक असून १९९८ मध्ये जे घडले त्याचे दडपण बाळगत नाही. त्यावेळच्या खेळाडूंनी जे काही केले ते शानदार होते, पण आम्ही आमचा स्वत:चा इतिहास लिहिण्यास इच्छुक आहोत. आम्ही खेळाचा आनंद घेण्याबाबत सकारात्मक आहोत.’
क्रोएशियाला बुधवारी उपांत्य फेरीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्यांचे लक्ष्य २० वर्षांपूर्वीची कामगिरी पिछाडीवर सोडण्याचे आहे.
क्रोएशियाला १९९८ च्या विश्वकप स्पर्धेत यजमान फ्रान्सविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर फ्रान्सने प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले होते.
विश्वकप स्पर्धेत नशीब यजमान देशासोबत नव्हते, अशी प्रतिक्रिया रशियाचे प्रशिक्षक चेर्चेसोव्ह यांनी व्यक्त केली. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ते बोलत होते.
रशियाची वाटचाल शानदार होती. त्यांनी अंतिम १६ मध्ये स्पेनचा शूटआऊटमध्ये पराभव केला. रशिया शनिवारी क्रोएशियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत अतिरिक्त वेळत २-२ ने बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये ३-४ ने पराभूत झाले.
चेर्चेसोव्ह म्हणाले, ‘नशीब आमच्यासोबत नव्हते. आमचे खेळाडू युद्धाची तयारी करीत असल्याप्रमाणे भासत होते, पण त्यापूर्वीच त्यांची सेवा संपविण्यात आली.’
चेर्चेसोव्ह पुढे म्हणाले,‘मी अद्याप या पराभवातून सावरलेलो नाही. स्पर्धेत सर्वांत तळाचे मानांकन असलेल्या रशियाकडून फार मोठ्या आशा नव्हत्या, पण त्यांनी आपल्या कामगिरीने चकित केले.’