फुटबॉल स्पर्धेतील सहभागावरून वादामुळे भारत चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 12:34 AM2018-07-03T00:34:10+5:302018-07-03T00:34:36+5:30
अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) टीकास्त्र सोडले. मात्र ‘आयओए’ नमण्याची चिन्हे दिसत नसल्याने एआयएफएफने या स्पर्धेसाठी स्वत:च्या हिमतीवर संघ पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे.
- सचिन खुटवळकर
अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) टीकास्त्र सोडले. मात्र ‘आयओए’ नमण्याची चिन्हे दिसत नसल्याने एआयएफएफने या स्पर्धेसाठी स्वत:च्या हिमतीवर संघ पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे.
जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला विश्वचषक पात्रता फेरीचे दार काही उघडता आलेले नाही. त्यामुळे एआयएफएफला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागते. अलीकडील काही वर्षांत भारतीय फुटबॉलमध्ये बरीच सुधारणा झाली. मात्र, संघाला हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याने क्रिकेट, हॉकीच्या तुलनेत फुटबॉलची पिछेहाट थांबताना दिसत नाही. आयओए व एआयएफएफमधील वादामुळे हाच मुद्दा पुन्हा नव्याने समोर आला आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या नियमांनुसार, कुठल्याही स्पर्धेच्या क्रमवारीत १ ते ८ या दरम्यान राष्ट्रीय संघ असेल, तरच त्या स्पर्धेत सहभागी होण्यास मान्यता दिली जाते. सध्या भारतीय संघ आशियाई फुटबॉल क्रमवारीत १४व्या स्थानावर आहे. त्यामुळे आयओएच्या नियमांत संघाची कामगिरी बसत नाही. साहजिकच संघाला आशियाई फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यास नकार देण्यात आला.
या प्रकारानंतर भडकलेल्या एआयएफएफने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला फुटबॉलचा गंध नसल्याची बोचरी टीका केली. आम्ही क्रमवारीत पिछाडीवर असल्याचे मान्य करतो. मात्र, आम्हाला अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधीच मिळत नसेल, तर खेळाडूंना मातब्बर संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव तरी कसा मिळणार? असे अनुभव मिळाल्याशिवाय कोणत्याही देशाच्या क्रीडा विश्वाचा विकास होत नाही. फुटबॉल हा सर्वांत मोठा खेळ असून तो २१२ देश खेळतात. सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पाच आशियाई संघ सहभागी झाले आहेत. भारतीय संघाला ही मजल मारण्यासाठी बरीच वर्षे वाट पाहावी लागेल. त्यासाठी खेळाडूंच्या कौशल्य विकासाकरिता मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग महत्त्वाचा ठरतो.
- प्रशिक्षक व खेळाडूंच्या कठोर परिश्रमांमुळे भारतीय फुटबॉल संघाने १७३व्या क्रमांकावरून ९७व्या स्थानापर्यंत सुधारणा केली आहे.
- आयएसएलसारख्या स्पर्धांतील विदेशी खेळाडू, प्रशिक्षकांच्या सहभागामुळे राष्ट्रीय खेळाडूंना तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करण्याचा मोठा अनुभव मिळतो.
- भारतात ब-यापैकी फुटबॉल संस्कृती रुजलेली असतानाही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघाचे प्रदर्शन निराशाजनकच राहिले आहे.
- ही स्थिती बदलण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच खेळाडूंसाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती करणे गरजेचे आहे.