भारताने सिरियाला बरोबरीत रोखले, नरेंद्र गहलौतचा गोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:40 AM2019-07-17T04:40:05+5:302019-07-17T04:40:11+5:30
भारताचा युवा फुटबॉलपटू नरेंद्र गहलौत याने केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गोलच्या जोरावर भारताने मंगळवारी इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल स्पर्धेत सिरियाला १-१ असे बरोबरीत रोखले.
नवी दिल्ली : भारताचा युवा फुटबॉलपटू नरेंद्र गहलौत याने केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गोलच्या जोरावर भारताने मंगळवारी इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल स्पर्धेत सिरियाला १-१ असे बरोबरीत रोखले. स्पर्धेतील हा शेवटचा साखळी सामना होता. ताजिकिस्तान व उत्तर कोरियाकडून पराभूत झाल्याने भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान यापुर्वीच संपुष्टात आले आहे. या सामन्यात भारताची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
गतविजेत्या असलेल्या भारतताला या स्पर्धेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चार देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ एका गुणांसह तळाच्या स्थानी राहिला. भारतीय संघाची स्पर्धेची सांगताही पराभवानेच झाली.
पुर्वार्धात दोन्ह्ी संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला. त्यामुळे दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गोल करण्याचा अनेक संधी वाया घालवल्या. पास देताना भारतीय खेळाडूंकडून वारंवार चुका होत होत्या. मात्र याचा लाभ सिरियाच्या खेळाडूंनाही उठवाता आला नाही.
पुर्वार्धात गोल करता न आल्याने भारताने उत्तरार्धात आक्रमक पावित्रा घेतला. सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला नरेंद्र गहलौत याने गोल करत भारताला पहिले यश मिळवून दिले. अनिरुद्ध थापाने दिलेल्या क्रॉसवर नरेंद्रने सुंदर गोल नोंदवला. मात्र ही आघाडी भारताला टिकवता आली नाही.
सिरियाच्या अल खातिब याने ७८ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत सामन्यात बरोबरी साधली. भारताच्या जेरी रिनजुआला याने अल अहमद याला पाडल्याने पेनल्टी बहाल करण्यात आली होती.
स्पर्धेतील अंतिम सामना ताजिकिस्तान व उत्तर कोरिया या संघादरम्यान शुक्रवारी खेळवला जाणार आहे.