ताजिकिस्तानकडून भारत पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:31 AM2019-07-08T05:31:09+5:302019-07-08T05:31:17+5:30
इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल चषक : छेत्रीचे गोल व्यर्थ
अहमदाबाद : पहिल्या हाफमध्ये कर्णधार सुनील छेत्रीच्या शानदार गोलनंतर आघाडी मिळवणाऱ्या भारतीय संघाला ताझिकिस्तानविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. दुसºया सत्रात ताझिकिस्तानने चार गोल नोंदवले. इंटरकॉँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील हा पहिलाच सामना होता. भारत ४-२ ने पराभूत झाला. छेत्रीने पहिल्या सत्रात भारतीय संघाला मजबूत आघाडी मिळविली होती. दुसºया सत्रात प्रतिस्पर्धी संघाने २० मिनिटांच्या आत ४ गोल नोंदवले.
सुरुवातीला चौथ्या मिनिटालाच भारताला पेनल्टी मिळाली होती. याचा फायदा उठवत सुनील छेत्रीने गोल नोंदवला. या शानदार कामगिरीनंतर छेत्रीने पुन्हा संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने मध्यंतरापर्यंत २-० आघाडी घेतली होती. संघ प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरेल, असे वाटत असताना ताझिकिस्तानने भारतीय बचाव भेदला. त्यांच्या तुर्सनोव याने ५५ व्या मिनिटाला पहिला तर बोबीव याने बरोबरी साधणारा गोल नोंदवला.
मोहम्मदजोन रहिमोव याने ७१ व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवला. ७५ व्या मिनिटाला शाहरोम सामिव याने गोल नोंदवून भारतीय संघाला पूर्णत: बॅकफूटवर नेले. या पराभवानंतर आता भारताचा पुढील सामना १३ जुलैला उत्तर कोरियाविरुद्ध होणार आहे.
मंदार, आदिलचे पदार्पण
आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचा कर्णधार असलेल्या मंदार राव देसाई आणि आदिल खान या दोन गोमंतकीय खेळाडूंनी भारतीय फुटबॉल संघाकडून पर्दापण केले. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल चषकासाठी २५ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. ही निवड अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने केली होती. त्यात चार गोमंतकीयांची वर्णी लागली होती. यामध्ये बचावपटू आदिल खान, मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस, रॉलिन बॉर्जेस आणि एफसी गोवाचा कर्णधार मंदार राव देसाई यांचा समावेश होता. मंदार आणि आदिल यांना तझिकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.