भारतीय कुमार फुटबॉलपटूंची विजयी घोडदौड कायम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 09:09 AM2018-08-08T09:09:06+5:302018-08-08T09:09:30+5:30
आशियाई विजेत्या इराकला नमवून इतिहास घडवणाऱ्या भारताच्या कुमार संघाने बुधवारी बलाढ्य येमेनचाही धुव्वा उडवला.
जॉर्डन - आशियाई विजेत्या इराकला नमवून इतिहास घडवणाऱ्या भारताच्या कुमार संघाने बुधवारी बलाढ्य येमेनचाही धुव्वा उडवला. भारताने पाच देशांच्या वेस्टर्न आशिया फुटबॉल फेडरेशन ( १६ वर्षांखालील) स्पर्धेतील अखेरच्या लढतीत येमेनवर ३-० अशा फरकाने विजय मिळवला.
सेंट्रल डिफेंडर हरप्रीत सिंगने ३७ व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांत भारताकडून दुसरा गोल झाला आणि येमेनने हार मान्य केली. रिड डिमेलोने दुसरा गोल केला. ४७ व्या मिनिटाला रोहित दानूने तिसरा गोल नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Another match, another win for our U16 boys. With a perfect 3-0 victory over Yemen, our U16 boys wrap up the @waffootball U16 Championship with 3 wins from 4 matches. Bravo, boys. #BackTheBlue#AsianDream#WeAreIndiapic.twitter.com/H6OHsAIcgC
— Indian Football Team (@IndianFootball) August 7, 2018
या स्पर्धेत भारताने तीन विजय मिळवले, तर जपानकडून त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला. भारताने आशियाई विजेत्या इराकसह यजमान जॉर्डनला नमवले. संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस म्हणाले, की' खेळाडूंचा अभिमान वाटतो. त्यांनी आज अपेक्षेपेक्षा अधिक चांगला खेळ केला. या दौऱ्यातील अनुभवाचा खेळाडूना पुढील वाटचालीसाठी नक्की फायदा होईल.'
मलेशियात होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची पूर्वतयारीसाठी भारतीय फुटबॉल महासंघाने या दौऱ्याचे आयोजन केले होते. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतासमोर ' C' गटात इराण, व्हिएतनाम आणि इंडोनेशियाचे आव्हान आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या चार संघाना २०१९ च्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.