भारतीय संघाला ‘एक्पोजर ट्रीप’ची गरज; माजी गोलरक्षक ब्रम्हानंद शंखवाळकर यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 07:20 PM2019-01-18T19:20:22+5:302019-01-18T19:20:42+5:30
एएफसी चषकात भारतीय फुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय फुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही.
- सचिन कोरडे
पणजी - एएफसी चषकात भारतीयफुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीयफुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही. त्यांना ‘एक्स्पोजर ट्रीप’ची गरज आहे. जपान, कोरिया, कतार आणि युएई अशा देशांसोबत भारतीय संघाचे अधिक सामने व्हायला हवेत, असे मत भारताचे माजी गोलरक्षक तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त ब्रम्हानंद शंखावाळकर यांनी व्यक्त केले.
पणजीतील स्पोटर््स अॅण्ड वेलनेस स्पाच्या उद्घाटन प्रसंगी ब्रम्हानंद प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ते म्हणाले भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. खेळाडूंचा स्तरही उंचावला आहे. विदेशातील प्रशिक्षणाचा त्यांना फायदा झालेला आहे. परंतु, भारतीय संघाला दुसºया खंडातील देशांविरुद्ध खेळायला हवे. आपण केवळ त्याच त्या संघाविरुद्ध खेळून चालणार नाही. त्याचा विरोधी संघांना फायदा होईल, आपणास नाही.
भारतीय कर्णधार सुनील छेत्री आणि स्पेनचा लियोनेल मेस्सी या दोघांमध्ये तुलना करणे योग्य नाही. सुनील हा निश्चितपणे गुणवान भारताचा नंबर वन खेळाडू आहे. त्याचा मी आदर करतो पण मेस्सीसोबत त्याची तुलना करणे योग्य नाही. स्पॅनिश फुटबॉलचा दर्जा आणि स्तर खूप उंचीवर आहे. त्याची भारतीय फुटबॉलसोबत तुलना करणे योग्य होणार नाही. सुनील इंग्लंड, पोतुगाल आणि अमेरिकेच्या ब स्तरावरील क्लबकडून खेळला तर त्याला पाच-सहा गोल नोंदवता येणार नाहीत. त्यांचा स्तर फार वेगळा आहे.
आय-लीगचे विलिनीकरण अशक्य
आय-लीगचे आयएसलमध्ये विलिनीकरण करण्याची गोष्ट पुढे आली होती. मात्र ती प्रत्यक्षात होणार नाही. आय-लीगचा फार्मेट आणि आयएसलएलच्या वेगळा आहे. आयलीगला प्रेक्षकांची गर्दी कमी असते हे मान्य जरी असले तरी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला विलिनीकरण करणे अशक्य असे आहे.
प्रशिक्षकांवर ‘नो कोमेंट’
भारतीय प्रशिक्षक स्टेफन कॉस्टटाईन यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा एआयएफएफने अजून मंजूर केलेला नाही. एएफसी चषकात भारतीय संघ बहरिनकडून पराभूत झाला. हा पराभव भारतीय प्रशिक्षकांना पचवता आला नाही. या प्रदर्शनावर नाराज होत कॉस्टटाईन यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर ब्रम्हानंद यांनी बोलणे टाळले. त्यानी पदावर राहावे किंवा नाही हा निर्णय त्यांचा आहे. असे ब्रम्हानंद म्हणाले. आयएसलमधील भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय संघात अजूनही संधी मिळत नाही? याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय संघ हा केवळ पाच-सहा जणांचा नसतो. या संघाची निवड फेडरेशनही करीत नाही किंवा मॅनेजमेंटही करीत नाही. प्रशिक्षकावरही ही जबाबदारी असते. तोच संघ निवडतो. त्याच्या नजरेत जो खेळाडू योग्य असेल त्याला संधी मिळते.