भारतीय संघाने प्रेरणा घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:18 AM2017-10-12T00:18:13+5:302017-10-12T00:19:14+5:30
फुटबॉलच्या आठवणी जेवढ्या संस्मरणीय असतात तेवढ्याच अनेकदा कठोरही असतात. फिफा मानांकनामध्ये दहाव्या स्थानावर असलेल्या कोलंबियाविरुद्ध भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही, त्या वेळी हे अनुभवाला मिळाले.
गुरप्रीतसिंग संधू लिहितात...
फुटबॉलच्या आठवणी जेवढ्या संस्मरणीय असतात तेवढ्याच अनेकदा कठोरही असतात. फिफा मानांकनामध्ये दहाव्या स्थानावर असलेल्या कोलंबियाविरुद्ध भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही, त्या वेळी हे अनुभवाला मिळाले. ही लढत संघातील खेळाडूंसाठी नेहमी संस्मरणीय राहील. आम्हीसुद्धा ही लढत कधीच विसरू शकणार नाही. गोल नोंदविल्यानंतर पुढचा मिनिट किती महत्त्वाचा आहे, याची कल्पना खेळाडूंना आली असेल. अशा वेळी स्वत:ला शांत ठेवणे आणि प्रतिस्पर्धी संघाकडून गोल न खाणे महत्त्वाचे असते. पण, हा सर्व खेळाचा एक भाग आहे. जर तुम्ही चूक केली नाही तर तुम्ही चांगले खेळाडू होऊ शकत नाही. लक्ष्यापासून विचलित झाले तर नुकसान होऊ शकते. पण, तुम्ही जर १६ वर्षांचे असला तर या पातळीवर अशा प्रकारच्या वातावरणात खेळताना विचलित होणे स्वाभाविक आहे. पण, भारतीय संघ घानाविरुद्ध पुढच्या लढतीत यावर लक्ष ठेवेल. कोलंबियाप्रमाणे घानाचा संघही मजबूत आहे.
संघातील प्रत्येक खेळाडूने क्षमतेनुसार मैदानावर सर्वस्व झोकून खेळ करायला हवा. आम्ही कोलंबियाला पराभूत करू शकत होतो आणि प्रत्येक खेळाडूने या बाबीपासून प्रेरणा घ्यायला हवी. आपण स्वत:साठी निकष तयार केले आहेत. माझ्या मते प्रत्येक खेळाडूने वैयक्तिक हे निकष पूर्ण करायला हवे.
जॅक्सन सिंगचा गोल बघणे सुखद व शानदार अनुभव होता. बेंगळुरुमध्ये आपल्या हॉटेल रुमध्ये टीव्हीवर गोल नोंदविल्याचे बघितल्यानंतर मी व संदेश झगिन आपल्या बेडवरून जवळजवळ उसळलो. फिफा विश्वकपमध्ये भारतातर्फे हा पहिला गोल होता. आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षा करीत असलेला हा क्षण होता. काऊंटर अटॅकवर गोल खाल्ल्यानंतरही त्या गोलचा जल्लोष सुरूच होता.
या गोलमुळे आम्ही केवळ हजेरी लावणार नाही, याची फुटबॉल जगताला कल्पना आली असेल. संघाचा बचाव मजबूत आहे आणि आघाडीची फळीही एकमेकांना साथ देत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे घानाविरुद्धच्या लढतीतही खेळाडूंकडून सांघिक कामगिरी अपेक्षित आहे. स्टेडियममध्ये पुन्हा एकदा जल्लोष अनुभवायला मिळेल, याची मला आशा आहे. (टीसीएम)