भारताचा ५-० ने दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:12 AM2018-06-02T04:12:12+5:302018-06-02T04:12:12+5:30
भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने एकतर्फी झालेल्या फुटबॉल सामन्यात चीनी तैपेईवर ५ -० असा दणदणीत विजय मिळवला.
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने एकतर्फी झालेल्या फुटबॉल सामन्यात चीनी तैपेईवर ५ -० असा दणदणीत विजय मिळवला.
मुंबईतील फुटबॉल अरेनात झालेल्या आंतरखंडीय स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सबकुछ सुनील छेत्री असे स्वरूप होते. चीनी तैपेई संघाला भारताचा स्ट्रायकर आणि कर्णधाराच्या आक्रमक आणि वेगवान खेळाला रोखणे शक्यच झाले नाही.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ९९ वा सामना खेळत असलेल्या सुनिल छेत्री याने १४ व्या, ३४ व्या आणि ६२ व्या मिनिटाला गोल केला. यजमान संघाकडून उदांता सिह आणि प्रणय हलधर यांनी अनुक्रमे ४८ व्या आणि ७८ व्या मिनिटाला गोल केले.
मध्यांतरापर्यंत भारतीय संघ दोन गोलने आघाडीवर होता. त्यानंतर उदांता सिंह याने गोल करत भारताची आघाडी मजबूत केली. भारतीय संघाचा पुढचा सामना चार जूनला केनियासोबत होईल तर पाच जूनला न्युझीलंड आणि चीनी तैपेई यांच्यात सामना होईल. किर्गिस्तान विरोधातील पराभवानंतर प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाईन यांच्यासाठी हे एक मोठे पुनरागमन मानले जात आहे. सामन्यात तिसऱ्या मिनिटाला उदांता सिंह याने सुनील छेत्रीकडे पास देत गोल करण्याची संधी निर्माण केली होती. मात्र हा गोल होऊ शकला नाही. त्यानंतर दोन्ही संघाकडून एकमेकांच्या गोलपोस्टवर आक्रमण झाले. १४ व्या मिनिटाला जेजे याने चीनी तैपेईच्या संरक्षकांना चकवून छेत्रीकडे पास दिला. त्यानंतर छेत्री याने आपले कौशल्य दाखवत अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यावर भारताचे वर्चस्व राहिले.