आशिया चषकासाठी भारताचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:46 AM2020-04-06T04:46:08+5:302020-04-06T04:46:20+5:30
२०२७च्या फुटबॉल स्पर्धेसाठी केला दावा : सौदी अरबदेखील यजमानपदासाठी इच्छुक
नवी दिल्ली: एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा २०२७ च्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला.
एआयएफएफचे सचिव कुशल दास यांनी सांगितले की,‘आम्ही यापूर्वीच एएफसीसमोर आमचा प्रस्ताव ठेवला आहे. आता फक्त याची गरज होती.’ कोविड -१९ या महामारीमुळे स्पर्धेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी एएफसीने ३१ मार्च ही अंतिम तारीख ३० जून अशी केली आहे.
एफएसीने म्हटले आहे की,‘एएफसीला लवकरात लवकर या स्पर्धेची घोषणा करायची आहे. कारण दर चार वर्षांनी होणाऱ्या आशिया खंडातील या मोठ्या स्पर्धेेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. या स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात येथे २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेतील २४ संघ सहभागी होणार आहेत.’
पुढील वर्षाच्या सुरुवातीला या स्पर्धेच्या यजमान देशाचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे. भारताशिवाय सौदी अरेबियानेही आशियाई चषक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. सौदी अरेबियाने तीनवेळा हा चषक जिंकला आहे. मात्र त्यांना कधी या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली नाही.
भारताने यापूर्वी २०२३ च्या एएफसी आशिया चषक स्पर्धेसाठीही आपली दावेदारी सादर केली होती. मात्र आॅक्टोबर २०१८ मध्ये भारताने यातून माघार घेतली. थायलंड व दक्षिण कोरियानेही माघार घेतल्याने चीनला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. (वृत्तसंस्था)