जॅक्सन सुरुवातीला डावलला गेला होता...अन् केला ऐतिहासिक गोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:20 AM2017-10-11T01:20:00+5:302017-10-11T01:21:30+5:30
फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू असा इतिहास रचलेला जॅक्सन सिंगला सुरुवातीला निवडकर्त्यांनी डावलले होते.
मुंबई : फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू असा इतिहास रचलेला जॅक्सन सिंगला सुरुवातीला निवडकर्त्यांनी डावलले होते. मात्र, आपली निवड सार्थ ठरवताना जॅक्सनने स्वत:ला सिद्ध केले. कोलंबियाविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात जॅक्सनने भारताला पिछाडीवरून बरोबरी साधून दिली होती. परंतु, तो सामना जिंकण्यात भारताला अपयश आले होते.
१७ वर्षांखालील भारतीय संघात जॅक्सनच्या निवड होण्याची गोष्ट खूप रंजक आहे. भारताच्या युवा संघाच्या निवडीसाठी निवडकर्ते चंदीगड फुटबॉल अकादमीमध्ये गेले होते. त्याठिकाणी जॅक्सनही चाचणी फेरीसाठी उपस्थित होता. परंतु, ६ फूट उंचीचा जॅक्सन त्यांना खटकला. १४ वर्षांच्या तुलनेत इतकी उंची खूप जास्त असल्याचे मत निवडकर्त्यांनी दिले आणि जॅक्सनला थेट नकार दिला होता. परंतु, जॅक्सनने हार मानली नाही. एक दिवस आपण भारताकडून नक्की खेळू, असा ठाम विश्वास असल्याने त्याने प्रयत्न सोडले नव्हते.
यानंतर, जॅक्सनने पंजाबच्या मिनर्वा अकादमीकडून खेळताना वयाच्या १६ व्या वर्षी सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, तरीही युवा विश्वचषक स्पर्धेचे द्वार त्याच्यासाठी कठीण बाब होती. दरम्यान, युवा भारतीय संघाविरुद्ध गोव्यात झालेल्या मैत्री सामन्यात जॅक्सनने मिनर्वा संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या वेळी उपस्थित असलेले प्रमुख प्रशिक्षक लुईस नॉर्टन दि मातोस यांनी लगेच मिनर्वा संघातील नोंग्डाबा नाओरेम, मोहम्मद शाहजहान, अन्वर अली यांच्यासह जॅक्सनलाही लगेच १७ वर्षांखालील भारतीय संघात निवडले. जॅक्सनचे वडील देबेन स्वत: फुटबॉलपटू होते. त्यांनी जॅक्सनला फुटबॉलचे प्राथमिक धडे दिले.