रिअल माद्रिदची धुरा सांभाळणार ‘घरचा भिडू’
By सचिन खुटवळकर | Published: June 13, 2018 07:39 PM2018-06-13T19:39:44+5:302018-06-13T19:41:12+5:30
झिदानची जागा घेणार ज्युलन लॉपितेगी
रिअल माद्रिद या स्पेनमधील बलाढ्य फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदावरून फ्रान्सचा सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू झिनेदिन झिदान पायउतार झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे ५१ वर्षीय प्रशिक्षक ज्युलन लॉपितेगी यांची नियुक्ती रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावर होणार आहे. या पदासाठी विविध देशांचे व क्लबचे २२ प्रशिक्षक/माजी खेळाडू दावेदार होते. मात्र, रिअल माद्रिदच्या व्यवस्थापनाने लॉपितेगी यांच्या नावाला पसंती दिली. रशियामधील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या समाप्तीनंतर लॉपितेगी राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होऊन रिअल माद्रिदची धुरा हाती घेतील. स्पॅनिश राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून ज्युलन लॉपितेगी यांची जागा फर्नांडो हिरो घेणार आहेत.
कोण आहेत लॉपितेगी?
- स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी फुटबॉलपटू ज्युलन लॉपितेगी यांनी गोलरक्षक म्हणून छाप पाडली. रिअल माद्रिद क्लबसाठीही त्यांनी योगदान दिले. १९९४मध्ये फिफा विश्वषचकात त्यांनी स्पेनच्या संघातून सहभाग घेतला.
- २00३ सालापासून त्यांनी स्पेनच्या १९ वर्षांखालील तसेच २१ वर्षांखालील संघांची बांधणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे देशातील प्रतिभावान खेळाडूंची अचूक ओळख त्यांना आहे. २0१0 ते २0१४ या काळात स्पेनला १९ वर्षांखालील व २१ वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
- २0१४ साली एप्रिलच्या अखेरीस त्यांनी करार संपुष्टात येताच रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनला रामराम करत क्लब फुटबॉल क्षेत्रात शिरकाव केला. पोर्तुगालच्या एफसी पोर्तोने मे २0१४मध्ये त्यांना करारबद्ध केले. या संघात लॉपितेगी यांनी तब्बल ७ स्पॅनिश युवा खेळाडूंना संधी दिली.
- २0१६मध्ये विसेंट दे बॉस्क यांच्या निवृत्तीनंतर स्पेनच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी लॉपितेगी यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी एका नव्या अवकाशाला गवसणी घातली. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून नवनव्या चाली रचणे आणि कुशल व्यवस्थापन ही लॉपितेगी यांची वैशिष्ट्ये आहेत.
- स्पेनच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर रशियात होत असलेल्या फिफा विश्वचषकासाठी संघाला पात्र ठरविण्यासाठी कठोर मेहनत घेतली. २०१० मध्ये विसेंट दे बॉस्क यांनी प्रशिक्षक म्हणून स्पेनच्या विश्वविजयात मोलाची भूमिका बजावली होती.
- आता प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्यापूर्वी स्पेनला रशियामध्ये विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी ज्युलन लॉपितेगी उत्सुक असतील. त्यानंतर रिअल माद्रिदचा हुकमी एक्का तथा पोर्तुगालचा चढाईपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या खेळाला नवे पैलू पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.