INDIA VS IRAQ : भारताकडून पंचांनी विजय हिरावून घेतला, इराकने ७ पेनल्टी किकवर सामना जिंकला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:17 PM2023-09-07T18:17:19+5:302023-09-07T18:18:17+5:30
KING'S CUP 2023, INDIA VS IRAQ - किंग्स कपच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इराकने रोमहर्षक सामन्यात भारतावर २-२ ( ५-४) असा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला.
KING'S CUP 2023, INDIA VS IRAQ - किंग्स कपच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इराकने रोमहर्षक सामन्यात भारतावर २-२ ( ५-४) असा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. भारताला किंग्स कपच्या फायनलमध्ये प्रथमच धडक देण्याची संधी होती अन् त्यांनी आघाडीही घेतली होती. परंतु दोन्ही वेळेस इराकला पेनल्टी किक मिळाली अन् त्यांनी निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. पेनल्टी शूटआऊटमध्ये मात्र भारताला हार मानावी लागली. फर्नांडेसचा चुकलेला पहिला प्रयत्न भारताला महागात पडला. निर्धारित वेळेत इराकला मिळालेले दोन्ही पेनल्टी या वादात अडकल्या आहेत. रेफरीने भारतीय संघावर अन्याय केल्याची चर्चा आहे.
भारत-इराक यांच्यात पहिल्या हाफमध्ये १-१ अशी बरोबरी. महेश नाओरेम सिंगने १६व्या मिनिटाला मिळवून दिली होती आघाडी. २८व्या मिनिटाला पेन करिमने इराकसाठी बरोबरीचा गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये आकाश मिश्राने मारलेला चेंडू इराकचा गोलरक्षक जला हसनने रोखला, परंतु त्यावर नियंत्रण राखण्यात तो अपयशी ठरला. चेंडू गोलजाळीत विसावला आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळाली. ७२व्या मिनिटाला गुरप्रीत सिंग संधूने अप्रतिम बचाव करून इराकला पुन्हा बरोबरी मिळवू दिली नाही. भारताचा बचावही भक्कम होता आणि त्यांनी इराकचे प्रयत्न हाणून पाडले होते.
८०व्या मिनिटाला इराकला पेनल्टी मिळाली. निखिल पुजारी आणि संदेश झिंगान यांनी इराकच्या खेळाडूा पेनल्टी क्षेत्रात पाडले. आयमन हुसेनने इराकसाठी बरोबरीचा गोल केला. ८४व्या मिनिटाला हुसेन तिसऱ्या गोलच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु त्याचा हेडर चुकला अन् गुरप्रीतने चांगला बचाव केला. त्यामुळे हलबल झालेल्या इराकच्या खेळाडूने ९०+३ मि. राग काढला. इक्बालने भारताच्या फर्नांडेसच्या चेहऱ्यावर कोपरा मारला अन् रेफरीने लगेच त्याला रेड कार्ड देऊन बाहेर केले. निर्धारित वेळेत २-२ अशा बरोबरीमुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
पेनल्टी शूटआऊट...
- ब्रेंडन फर्नांडेसचा पहिला गोल पोस्टला लागून अयशस्वी ठरला
- इराकच्या मेर्चास डोस्कीने गोल करून आघाडी घेतली, गुरप्रीतने अडवण्याचा पुर्ण प्रयत्न केला.
- संदेशन झिंगनने चतुराईने गोल करून भारताचे खाते उघडले
- अली अदनानने सहज गोल करून इराकची आघाडी २-१ अशी मजबूत केली
- भारताच्या सुरेश वांगजामने गोल केला अन् सामना २-२ असा बरोबरीत आला
- आयमन हुसेनने गुरप्रीतला चकवले अन् इराकला पुन्हा ३-२ अशा आघाडीवर आणले
- भारताकडून अन्वर अलीने गोल केला, अल हमावीने इराकला ४-३ असे पुढे नेले
- रहिम अलीने ४-४ अशी बरोबरी मिळवली अन् आता गुरप्रीतवर सर्व मदार होती
- इराकच्या बाशर रसान बोन्यानने गोल करून इराकचा २-२ ( ५-४) असा विजय पक्का केला.