एमबाप्पेमुळे टळला जगज्जेत्या फ्रान्सचा पराभव; आईसलॅन्डविरुद्ध साधली २-२ अशी बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 04:51 AM2018-10-13T04:51:21+5:302018-10-13T04:51:34+5:30
केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला.
गुईनगॅम्प(फ्रान्स) : केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला.
बिकिर बजार्सन याने ३० व्या मिनिटाला आईसलॅन्डला आघाडी मिळवून दिली. नंतर ५८ व्या मिनिटाला केरी अर्नासनने हेडरद्वारे गोल नोंदवून आघाडी दुप्पट केली. अर्ध्या तासाचा खेळ शिल्लक असताना एमबाप्पे बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. त्याने फ्रान्सकडून दोन गोल नोंदविण्यात मोलाची भूमिका बजावली.
८६ व्या मिनिटाला त्याचा शॉट वाचविण्यात प्रतिस्पर्धी बचावफळीला यश आले होते पण एका खेळाडूच्या चुकीमुळे हा गोल झाला. ९० व्या मिनिटाला एमबाप्पेने मारलेल्या कॉर्नर किकवर प्रतिस्पर्धी खेळाडूचा चेंडूला हात लागला. त्यावर फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली. एमबाप्पेने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करीत फ्रान्सची इभ्रत शाबूत राखली.(वृत्तसंस्था)
रोनाल्डोविना पोर्तुगालचा विजय
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थित खेळणाऱ्या युरोपियन चॅम्पियन पोर्तुगालने पोलंडचे आव्हान ३-२ असे परतावले. पोर्तुगालने २० मिनिटांमध्ये ३ गोल करताना बाजी मारली. पोर्तुगालकडून आंद्रे सिल्वा (३२वे मिनिट) व बर्नाडो सिल्वा (५२) यांनी गोल केले. पोलंडच्या कामिल ग्लिक याने ४३व्या मिनिटाला स्वयंगोल केला.
मेस्सीच्या अनुपस्थितीत अर्जेंटिनाचा धडाका
स्टार व हुकमी स्ट्रायकर लिओनेल मेस्सीविना खेळूनही अर्जेंटिनने नेशन्स लीग स्पर्धेत इराकचा गुरुवारी ४-० असा फडशा पाडला. लोटारो मार्टिनेझ (१८वे मिनिट), रॉबर्टो परेरा (५३) यांनी संघाला आघाडीवर नेले. बचावपटू जर्मन पेजेलाच्या हेडरद्वारे तिसरा तर फ्रेंको सेर्वीने केलेल्या चौथ्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने विजय निश्चित केला.