भारताच्या सुवर्ण युगाचे साक्षीदार, दिग्गज फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 05:19 AM2020-03-21T05:19:55+5:302020-03-21T05:32:31+5:30

१९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण विजेत्या भारतीय फुटबॉल संघाच्या सुवर्ण युगाचे बॅनर्जी साक्षीदार राहिले.

legendary footballer P.K. Banerjee Passes away | भारताच्या सुवर्ण युगाचे साक्षीदार, दिग्गज फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन

भारताच्या सुवर्ण युगाचे साक्षीदार, दिग्गज फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन

googlenewsNext

कोलकाता : तब्बल ५१ वर्षे भारतीय फुटबॉल विश्वाला सेवा देणारे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. बॅनर्जी यांच्या पश्चात त्यांची मुलगी पाऊला आणि पूर्णा आहेत. दोघीही शिक्षणतज्ज्ञ आहेत. बॅनर्जी यांचे लहान भाऊ प्रसून बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. पीके बॅनर्जी, चुन्नी गोस्वामी आणि तुलसीदास बलराम हे त्रिकूट भारतीय फुटबॉलची ओळख बनले होते.

१९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण विजेत्या भारतीय फुटबॉल संघाच्या सुवर्ण युगाचे बॅनर्जी साक्षीदार राहिले. गेल्या काही वर्षांपासून त्यांना न्युमोनियाने ग्रासले होते. त्यातच पार्किन्सन, ह्दयाघात आणि डिमेन्शिया अशा आजारांची भर पडल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. २ मार्चपासून ते रुग्णालयात होते. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

२३ जून १९३६ ला जलपाईगुडीच्या बाह्य भागात असलेल्या मोयनागुडी येथे जन्मलेले बॅनर्जी फाळणीनंतर जमशेदपूर येथे स्थायिक झाले. १९६२ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर बॅनर्जी यांनी १९६० च्या रोम आॅलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व केले. फ्रान्सविरुद्ध १-१ अशा बरोबरीत सुटलेल्या सामन्यात त्यांनी गोल केला होता.
ते १९५६ च्या मेलबोर्न आॅलिम्पिकमध्येही खेळले. उपांत्यपूर्व सामन्यात आॅस्ट्रेलियावरील ४-१ ने विजयात त्यांची मोलाची भूमिका होती. फिफाने २००४ ला त्यांना शतकातील आॅर्डर आॅफ मेरिटने सन्मानित केले. १९५२ मध्ये बिहारकडून संतोष चषकात पदार्पण केलेल्या बॅनर्जी यांनी एकूण ८४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ६५ गोल केले. १९६७ ला त्यांनी फुटबॉलमधून निवृत्त घेतली, मात्र यानंतर प्रशिक्षक या नात्यानेदेखील त्यांनी ५४ पुरस्कार जिंकले आहेत. (वृत्तसंस्था)

प्रशिक्षक म्हणूनही छाप
कारकिर्दीत बॅनर्जी कधीही मोहन बगान किंवा ईस्ट बंगालसाठी खेळले नाहीत. आयुष्यभर ते पूर्व रेल्वे संघाचे सदस्य होते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी मोहन बगानला आयएफए शिल्ड, रोव्हर्स चषक आणि ड्यूरंड चषक जिंकून दिला. ईस्ट बंगालचे प्रशिक्षक असताना त्यांनी १९९७ च्या फेडरेशन चषकाच्या उपांत्य सामन्यात मोहन बगानला हरविण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

बॅनर्जींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले - भुतिया
‘पी. के. बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे,’ असे भारताचा माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया याने म्हटले. मोहन बागानविरुद्धच्या एका सामन्यावेळी भूतिया व प्रशिक्षक अमल दत्ता यांच्यात वाक्युद्ध झाले होते. मात्र बॅनर्जी यांनी याचा दबाव स्वत:वर घेतला. बायचुंगला याची झळ पोहोचू दिली नाही. १९९७ मध्ये फेडरेशन चषक उपांत्य सामन्यात दत्त यांनी बायचुंगवर अनावश्यक टीका केली होती. भुतिया म्हणाला,‘ यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. पीके यांनी याचा कसलाही दबाव खेळाडंूवर येऊ दिला नाही. ते शांत होते. यामुळेच ते खेळाडूंकडून सर्वाेत्कृष्ट कामगिरी करुन घेऊ शकले. हा सामना माझ्या कारकिर्दीतील मोठ्या सामन्यापैकी एक होता.’

भारताचे महान फुटबॉलपटू प्रदीपकुमार बॅनर्जी यांच्या निधनाबद्दल विनम्र श्रद्धांजली. काही प्रसंगी त्यांच्याशी भेटीगाठी झाल्या. त्या स्मृती सुखद आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.’
- सचिन तेंडुलकर
बॅनर्जी यांचे नाव भारतीय फुटबॉल विश्वात सुवर्ण युगाचे साक्षीदार म्हणून कायम स्मरणात असेल. प्रदीपदा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. भारतीय फुटबॉलमधल त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. प्रदीपदा, तुम्ही नेहमी आमच्या हृदयात असाल.
- प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, एआयएफएफ

आज मी एका जवळच्या प्रिय व्यक्तीला गमावले. एक अशी व्यक्ती ज्यांच्यावर माझे खूप प्रेम होते. त्यांचा मोठा आदर करायचो. त्यांचा माझ्या कारकिर्दीवर वयाच्या १८ व्या वर्षापासून प्रभाव राहिला.त्यांच्यातील सकारात्मकता अनेकांसाठी प्रेरणास्पद होती. - सौरव गांगुली
बॅनर्जी यांच्या निधनामुळे मार्गदर्शक गमावला. त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि फुटबॉल जगताबद्दल मी संवेदाना व्यक्त करतो. आम्हा सर्वांसाठी ते प्रेरणा होते. त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील.
- सुनील छेत्री, फुटबॉल स्टार

Web Title: legendary footballer P.K. Banerjee Passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.