लिओनेल मेस्सीचा पत्ता कट; सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीतून बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:55 AM2018-08-21T08:55:19+5:302018-08-21T08:55:44+5:30
वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूची शर्यत म्हटली की ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही नावे समोर असायलाच हवीत. गेली दहा वर्ष तरी असचं चालत आलय.
मुंबई- वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूची शर्यत म्हटली की ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही नावे समोर असायलाच हवीत. गेली दहा वर्ष तरी असचं चालत आलय. पण नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी पाहता काही बदल अपेक्षित होतेच. युरोपियन फुटबॉल महासांघाने ( युएफा) जाहीर केलेल्या सर्वोत्तम खेळाडूंच्या नामांकनात ते बदल पाहायला मिळाले.
युएफाने २०१७-१८ च्या सर्वोत्तम खेळाडूंची अव्वल तीन नामांकन जाहीर केली. रेयाल माद्रिदचा माजी आणि युव्हेंटसचा आजी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अव्वल तिघांत स्थान पटकावले आहे. मात्र त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी मेस्सीचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी रोनाल्डोसमोर दोन नवीन दावेदार उभे टाकले आहेत. माद्रिदचा लुका मॉड्रीच आणि लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह यांनी अव्वल तिघांत स्थान पटकावले आहे.
युरोपियन लीगच्या गटवार घोषणेच्यावेळी सर्वोत्तम पुरूष व महिला खेळाडू जाहीर करण्यात येईल. ३० ऑगस्टला मोनॅको येथे हा सोहळा पार पडणार आहे. सर्वोत्तम पुरूष खेळाडूंच्या दहा मानांकनात मेस्सी, अँटोइने ग्रिझमन, कायलिन मॅबाप्पे, केव्हीन डी ब्रूयने, राफेल वारने, ईडन हॅजार्ड आणि सर्गिओ रामोस यांचाही समावेश होता. मात्र यातील अव्वल तिघांची नावे जाहीर करण्यात आली.
रोनाल्डोने पाचवेळा चॅम्पियन्स लीग चषक उंचावला आहे आणि सलग सहा सत्र सर्वाधिक गोल त्याने केले आहेत. त्यामुळे युएफाचा हा पुरस्कार चौथ्यांदा पटकावण्यासाठी तो आतूर आहे. त्याने २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे. मोनॅकोत तो हॅटट्रिक करतो का, याची उत्सुकता लागली आहे.