फक्त इच्छाशक्ती हवी! मेस्सी आज फुटबॉल चॅम्पियन बनलाच नसता जर बालपणी 'या' गंभीर आजाराला हरवलं नसतं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 03:22 PM2022-12-14T15:22:07+5:302022-12-14T15:23:27+5:30
अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं नाव आज प्रत्येकाच्या ओठी आहे. मेस्सीच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं नाव आज प्रत्येकाच्या ओठी आहे. मेस्सीच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. वर्ल्ड नंबर वन खेळाडू म्हणून मेस्सी ओळखला जात असला तरी त्याचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. प्रत्येक यशस्वी खेळाडूमागे एक प्रचंड मोठी मेहनत आणि अडचणींचा सामना केलेला असतो. मेस्सी देखील याला अपवाद नाही. मेस्सीच्या बाबतीत एक गोष्ट खूप कमी जणांना माहित आहे ती म्हणजे त्यानं बालपणी एका गंभीर आजारावर मात केली आहे. त्या आजाराला जर मेस्सीनं हरवलं नसतं तर आज तो चॅम्पियन फुटबॉलपटू नसता.
वयाच्या ११ व्या वर्षी मेस्सीला त्याच्या आजाराबाबत समजलं. या आजाराला ग्रोथ हार्मोन डेफिशिएन्सी असं म्हटलं जातं. या आजारामध्ये व्यक्तीची शाररीक वाढ खुंटते. म्हणजे हा आजार उंचीशी निगडीत आहे. त्यावेळी आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी देखील मेस्सीकडे पैसे नव्हते. मेस्सीचे वडील एका कारखान्यात काम करत होते तर आई क्लिनरचं काम करायची.
गंभीर आजारावर मात करुन मेस्सी बनला चॅम्पियन
मेस्सीची शाररीक वाढ झालीच नसती तर विचार करा की तो फुटबॉल खेळू शकला असता का? आजाराची कल्पना मिळाल्यानंतर पुढची ३ वर्ष तर सामान्य होती. पण २००० साली मेस्सीच्या वडिलांना बार्सिलोना क्लबच्या टॅलंट हंटची माहिती मिळाली. उपचारासाठी आशेचा किरण वडिलांना दिसत होता. त्यामुळे मेस्सीचे वडील थेट स्पेनला पोहोचले. त्यांनी थेट बार्सिलोनाच्या क्लबच्या डायरेक्टसोबत चर्चा केली. मेस्सीच्या आजाराबाबत माहिती दिली. स्पेनला येऊन राहण्याच्या अटीवर बार्सिलोना क्लबनं मेस्सीला आपल्या ताफ्यात सामील केलं. यानंतर मेस्सीच्या आजारावर उपचार देखील झाले आणि फुटबॉलच्या जगताला सुपरस्टार खेळाडू मिळाला.
FIFA WC 2022 मध्ये मेस्सीची जादू
फूटबॉल म्हटलं की मेस्सीचं नाव सर्वात आधी का घेतलं जातं याचं ताजं उदाहरण म्हणजे सध्याचा कतारमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्डकप आहे. मेस्सीनं आतापर्यंत कतार वर्ल्डकपमध्ये ६ सामने खेळले आहेत आणि ५ गोल नावावर आहेत. ३ गोल असिस्ट केले आहेत. वर्ल्डकपमध्ये अर्जेटिंनासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये मेस्सीचं नाव अव्वल स्थानी पोहोचलं आहे.
६ पैकी ४ सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच
फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये मेस्सीनं खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. यातूनच मेस्सीच्या जादूची ताकद लक्षात येते. आता मेस्सीची हिच किमया फायनलमध्ये दिसणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मेस्सी आपल्या करिअरमधील पहिला आणि अर्जेंटिनासाठी तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणार का याची उत्सुकता सर्वांना आहे.