धक्कादायक; त्या एका फुटबॉल सामन्यामुळे 41 जणांचा कोरोनानं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:30 AM2020-05-26T11:30:53+5:302020-05-26T11:31:51+5:30
स्पेनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 82,480 इतकी झाली आहे, तर ब्रिटनमधील हा आकडा 2 लाख 61,184 इतका आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 55 लाख 90,376 वर पोहोचली आहे. त्यापैकी 23 लाख 66,700 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 47,915 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या संकटात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अनेक फुटबॉल लीग पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, लीग रद्द करण्याच्या निर्णयापूर्वी खेळलेल्या अखेरच्या त्या एका सामन्यानं 41 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे.
लिव्हरपूल आणि अॅटलेटिको माद्रिद यांच्यात 11 मार्चला खेळवण्यात आलेल्या सामन्यात उपस्थित असलेल्यांपैकी 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा, संडे टाईम्सने केला आहे. चॅम्पियन्स लीगमधील उपउपांत्यपूर्व फेरीतील परतीचा सामना अॅनफिल्ड येथे खेळवण्यात आला. त्या सामन्याला 52 हजार प्रेक्षक उपस्थित होते आणि त्यात 3000 प्रेक्षक हे प्रवासी होते. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीचा हा अखेरचा सामना होता.
संडे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सुविधेतून मिळालेल्या आकड्यांवर अभ्यास करण्यात आला. त्यातून या सामन्याशी संबंधित असलेल्या 41 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली. मागील महिन्यात लिव्हरपूलचे महापौर यांनी या प्रकरणाची तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. ''कोणत्याही खेळाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसार होत असेल, तर त्या स्पर्धा व्हायला नकोत. अॅटलेटिको क्लबच्या फॅन्सकडून हा व्हायरस आमच्या देशातील लोकांपर्यंत पोहोचला का, याचा तपास सुरू आहे,'' असे लिव्हरपूलचे महापौर स्वीव्ह रॉथरम यांनी सांगितले.
अॅटलेटिकोनं हा सामना 3-2 अशा फरकानं जिंकला आणि गतविजेत्या लिव्हरपूलला 4-2 अशा सरासरी गोलनं स्पर्धेबाहेर केले. स्पेनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 82,480 इतकी झाली आहे, तर ब्रिटनमधील हा आकडा 2 लाख 61,184 इतका आहे.