महाराष्ट्र झाला फुटबॉलमय, - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:51 AM2017-09-16T03:51:19+5:302017-09-16T03:52:15+5:30
भारतात आयोजित होणाºया फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र फुटबॉलमय झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
मुंबई : भारतात आयोजित होणा-या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र फुटबॉलमय झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे महाराष्ट्र मिशन वन मिलियन अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी, फडणवीस यांच्यासह क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईचे डबेवाले यांच्यासह फुटबॉल किक करुन या अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी, दृष्टीहीन विद्यार्थ्यांसह मुंबईतील विविध शालेय विद्यार्थ्यांनीही यावेळी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. तसेच यावेळी राजकिय पत्रकार विरुध्द क्रीडा पत्रकार असा विशेष फुटबॉल सामनाही खेळविण्यात आला.
दरम्यान, या मिशन वन मिलियन अभियानाचे उद्घाटन झाल्यानंतर राज्यभरात दिवसभर लाखो विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. ‘सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी फुटबॉलचा आनंद लुटला. या अभियनामध्ये आम्ही एक मिलियनचे लक्ष्य ठेवले होते, परंतु हा आकडा २.५ मिलियनपर्यंत पोहचवण्याची कामगिरी विद्यार्थ्यांनी केली, अशी माहिती क्रीडामंत्री तावडे यांनी दिली.
‘भारतात पहिल्यांदाच फिफा स्पर्धेचे आयोजन होत असून फुटबॉलकडे अधिक युवा वर्गाला आकर्षिक करण्यासाठी राज्यभरात १० लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. या अभियानाचा मुंबईतून सुरुवात झाली असून राज्यभरात शालेय विद्यार्थी फुटबॉलचा
आनंद लुटतील. या अभियानामुळे संपुर्ण महाराष्ट्र फुटबॉलमय झाला आहे,’ असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले.