Cristiano Ronaldo: मोठी बातमी! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले; स्फोटक आरोपांनंतर वेगळे झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:07 AM2022-11-23T00:07:10+5:302022-11-23T00:07:48+5:30
Cristiano Ronaldo Leave Manchester United टीम आणि व्यवस्थापक एरिक हेग यांच्यासोबतच्या रोनाल्डोच्या तणावपूर्ण संबंधांमुळे त्याचे भविष्य संपुष्टात आले होते. आता फक्त औपचारिकताच बाकी होती.
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये मोडणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडच्या वाटा वेगळ्या झाल्या असून याची घोषणा क्लबने केली आहे.
टीम आणि व्यवस्थापक एरिक हेग यांच्यासोबतच्या रोनाल्डोच्या तणावपूर्ण संबंधांमुळे त्याचे भविष्य संपुष्टात आले होते. आता फक्त औपचारिकताच बाकी होती. यावर क्लबने दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या क्लबसोबतच्या कारकीर्दीबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. क्लबकडून 346 सामन्यांम्ध्ये 145 गोल केल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे क्लबने म्हटले आहे.
Cristiano Ronaldo is to leave Manchester United by mutual agreement, with immediate effect.
— Manchester United (@ManUtd) November 22, 2022
The club thanks him for his immense contribution across two spells at Old Trafford.#MUFC
रोनाल्डोची काही दिवसांपूर्वी एक प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली होती. यात रोनाल्डोने क्लबमधील वरिष्ठ व्यक्ती आणि संघातील सहकाऱ्यांवर कठोर टीका केली होती. तसेच मँचेस्टर युनायटेडने धोका दिल्याचा आरोप केला होता. क्लबचे व्यवस्थापक एरिक टेन हॅग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला जबरदस्तीने क्लबमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता.
महिन्याभरापूर्वी रोनाल्डोला शिस्तभंगाबाबतची ताकीद देण्यात आली होती. त्याने टोटेनहॅमविरूद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात जाण्यास नकार दिला होता. 'माझ्या मनात टॅन हँगविषयी आदर नाही कारण तो मला आदर देत नाही. फक्त प्रशिक्षक नाही तर क्लबमधील इतर दोघं तिघं देखील असंच वागतात. माझ्या मनात धोका दिल्याची भावना निर्माण झाली आहे., असे तो म्हणाला होता. यानंतर क्लबने हे पाऊल उचलले आहे.