फुटबॉलपटू मनितोम्बी यांचे ३९व्या वर्षी निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:26 AM2020-08-10T01:26:27+5:302020-08-10T01:27:21+5:30
इम्फाळजवळील आपल्या मूळगावी त्यांचे निधन झाले
कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाचे माजी बचावपटू मनितोम्बी यांनी रविवारी वयाच्या ३९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मोहन बागान संघाचे नेतृत्वही केले होते. इम्फाळजवळील आपल्या मूळगावी त्यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती खालावली होती. मिनितोम्बी यांच्या पश्चात पत्नी व ८ वर्षांचा मुलगा आहे.
क्लबने ट्विट केले की, ‘मोहन बागान परिवाराला माजी कर्णधार मनितोम्बी सिंग यांच्या आकस्मिक निधनाने दु:ख झाले आहे. या कठीणप्रसंगी आमच्या संवेदना त्यांच्या परिवारासह आहेत.’ २००३ मध्ये व्हिएतनामला ३-२ असे नमवून एलजी कप जिंकणाऱ्या २३ वर्षांखालील भारतीय संघात मनितोम्बी होते. त्यांनी २००२ मध्ये बुसान आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २००३ मध्ये बागानकडून पदार्पण केल्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या नेतृत्वात बागानने एअरलाइन्स गोल्ड चषक पटकावला होता. (वृत्तसंस्था)
एआयएसएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या संदेशात म्हटले की, हे ऐकून मला दु:ख झाले. मनितोम्बी सिंह आता नाहीत. महासचिव कुशल दास यांनी म्हटले की, मनितोम्बी एक प्रतिभाशाली फुटबॉलर आणि एक उत्तम खेळाडू होते.