युवा विश्वकप स्पर्धेने दिले अनेक स्टार खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:38 AM2017-09-25T01:38:28+5:302017-09-25T01:38:50+5:30
जगातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू नेमारपासून छोटे पासचा (टिकी-टाका) दिग्गज खेळाडू झेव्हियर हेर्नांडेज (जावी), आंद्रेस इनिएस्टा आणि महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो यांच्यामध्ये एक समानता आहे.
नवी दिल्ली : जगातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू नेमारपासून छोटे पासचा (टिकी-टाका) दिग्गज खेळाडू झेव्हियर हेर्नांडेज (जावी), आंद्रेस इनिएस्टा आणि महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो यांच्यामध्ये एक समानता आहे. हे सर्व अंडर-१७ फुटबॉल विश्वकप स्पर्धेनंतर सिनिअर पातळीवर यशस्वी खेळाडू ठरले आहेत.
भारतात ६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत १७ वी फिफा अंडर -१७ विश्वकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जगाला अनेक स्टार खेळाडू मिळू शकतात.
अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत खेळल्यानंतर विश्वकप जिंकण्याचा मान मिळवणाºया खेळाडूंमध्ये रोनाल्डिन्हो, इकर कॅसिलास, जावी, इनिएस्टा, टॉन क्रूस आणि मारियो गोएट््ज यांचा समावेश आहे.
ब्राझीलचा संघ १९९७ मध्ये अंडर-१७ विश्वकप विजेता ठरला होता त्यावेळी रोनाल्डिन्हो संघाचा सदस्य होता. याच विश्वकप स्पर्धेत कॅसिलास व जावी यांनी स्पेनला उपांत्य फेरी गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जावीपेक्षा चार वर्षे ज्युनिअर एनिएस्टा व फर्नांडो टोरेस यांनी २००१ मध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगोमध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धेत संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
त्यानंतर जावी व एनिएस्टा यांनी अनेक वर्षे स्पेनच्या राष्ट्रीय संघातर्फे आणि बार्सिलोना क्लबतर्फे खेळताना जगभरातील चाहत्यांना मोहित केले.
जपानमध्ये २००९ साली झालेल्या अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत खेळणारा ब्राझीलचा खेळाडू नेमार डा सिल्वा संतोसने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. त्याच्या संघाला मात्र साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता, पण आठ वर्षांनंतर तो जगातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू ठरला आहे. (वृत्तसंस्था)
ब्राझीलचा रोनाल्डिन्हो एकमेव असा खेळाडू आहे ज्याने फिफा अंडर-१७ विश्वकप (१९९७) आणि फिफा विश्वकप (२००२) जिंकलेला आहे. २००५ मध्ये सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार बेलोन डिओर जिंकणारा रोनाल्डिन्हो सध्या भारतात प्रीमिअर फुटसलमध्ये खेळत आहे. बेलोन डिओर पुरस्काराचा आणखी एक मानकरी लुई फिगो हासुद्धा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत खेळलेला आहे.