Euro 2020 : पेनल्टी शूटआऊटचा थरार, स्वित्झर्लंडकडून विश्वविजेत्या फ्रान्सची शिकार, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:01 AM2021-06-29T10:01:01+5:302021-06-29T10:02:39+5:30
Euro 2020 स्पर्धेत सोमवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. फुटबॉलप्रेमींसाठी सोमवारचा दिवस हा रोमहर्षक सामन्यांची मेजवानी घेऊन आला.
Euro 2020 स्पर्धेत सोमवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. फुटबॉलप्रेमींसाठी सोमवारचा दिवस हा रोमहर्षक सामन्यांची मेजवानी घेऊन आला. क्रोएशियानं माजी विश्वविजेत्या स्पेनला विजयासाठी झुंजवले, तर स्वित्झर्लंडनं विश्वविजेत्या फ्रान्सची पेनल्टी शूटआऊटमध्ये शिकार केली. १-३ अशा पिछाडीवरून क्रोएशियानं सामना ३-३ असा बरोबरीत आणला, परंतु भरपाई वेळेत स्पेननं दोन गोल करून ५-३ असा विजय पक्का केला. दुसरीकडे फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड सामना निर्धारीत वेळेत ३-३ असा बरोबरीत सुटला अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा हुकमी खेळाडू मॅबाप्पे याला गोल करण्यात अपयश आलं. स्वित्झर्लंडनं जिगरबाज खेळ करताना विश्वविजेत्यांना धक्का दिला.
पेड्रीच्या ( २० मि.) स्वयंगोलंनं क्रोएशियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण, स्पेननं चतुराईनं खेळ करताना ३८व्या मिनिटाला पाब्लो सॅरेबियाच्या गोलने १-१ अशी बरोबरी मिळवली. ५७व्या मिनिटाला अझपिलिक्युएटा व ७७व्या मिनिटाला फेरान टोरेसनं गोल करून स्पेनला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. स्पेन हा सामना सहज जिंकेल असे वाटत असताना क्रोएशियाकडून पलटवार झाला. एम ऑर्सिचनं ८५व्या मिनिटाला व एम पॅसेलिचनं ९०+२ भरपाई वेळेत गोल करून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळात कमालीची चुरस पाहायला मिळाली. पण, मोराटा ( १०० मि.) व मायकेल ओयार्झाबाल ( १०३ मि.) यांनी सुरेख गोल करताना स्पेनचा ५-३ असा विजय पक्का करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
फ्रान्सला झगडावे लागले, पण स्वित्झर्लंडनं सांघिक खेळ करताना विजय खेचून आणला. स्वित्झर्लंडनं १५व्या मिनिटाला गोल करून दणक्यात सुरूवात केली. एच सेफेरोव्हिचच्या गोलनं स्वित्झर्लंड फ्रंटसीटवर बसले आणि पहिल्या हाफमध्ये त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवली. मध्यंतरानंतर फ्रान्सचा अनुभवी खेळाडू करीम बेंझेमानं त्याचा करिष्मा दाखवला. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत त्यानं ५७ व ५९ अशा अवघ्या दोन मिनिटांत दोन सुरेख गोल करून फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यात ७५व्या मिनिटाला पॉल पोग्बानं भर घातली व स्वित्झर्लंडला बॅकफूटवर फेकले. पण, सहज हार मानेल तो स्वित्झर्लंड कसला. एच सेफेरोव्हिच ( ८१ मि.) व एम गॅव्हरानोव्हिच ( ९० मि.) यांनी अवघ्या ९ मिनिटांत सामन्याचे चित्र पालटले अन् फ्रान्सला ३-३ अशी बरोबरीवर आणून ठेवले. अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातही ही बरोबरी कायम राहिली अन् सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
स्वित्झर्लंडकडून गॅव्हरानोव्हिच, एफ स्कार, एम अकांजी, आर. व्हर्गास व ए मेहमेदी यांनी गोल केले. फ्रान्सकडूनही जशासतसे उत्तर मिळाले. पॉल पोग्बा, ऑलिव्हर जिरूड, एम थूरम, पी किम्पेम्बे यांनी गोल केले आणि आता पाचव्या पेनल्टीसाठी कायलिन मॅबाप्पे समोर होता. पण, ज्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा केल्या, त्यानेच निराश केले. निर्धारित वेळेतही मॅबाप्पेला गोल करण्यात अपयश आले आणि पेनल्टी शूटआऊटमध्येही तो चुकला अन् स्वित्झर्लंडनं ३-३ ( ५-४) असा विजय नोंदवला.