मेस्सीवर अपेक्षांचे भलेमोठे ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:07 AM2018-06-23T04:07:52+5:302018-06-23T04:08:03+5:30
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, अनेक अनपेक्षित निकाल समोर आले आहे.
-ंअयाझ मेमन
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, अनेक अनपेक्षित निकाल समोर आले आहे. यामध्ये सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला, तो अर्जेंटिनाचा पराभव. ते स्पर्धेबाहेर गेले नाही, पण त्या मार्गावर नक्कीच आहेत. अखेरचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी अनिवार्य बनले आहे. संभाव्य विजेत्यांपैकी एक असलेल्या अर्जेंटिनाचा खेळ पाहून सर्वांनाच धक्का बसला. याचे
कारण काय, तर दिग्गज मेस्सी अपयशी ठरतोय. एक संघ म्हणून ते विस्कळीत झालेले दिसत आहेत. अर्जेंटिनाची प्रसिद्ध ३-५-२ प्रणाली या वेळी पूर्ण अपयशी ठरली. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसरा सामना ते हरले. हा संघ सर्वाधिक मेस्सीवर अवलंबून राहिल्याचे
दिसले, सहाजिकच आहे ते... कारण जगातील अव्वल खेळाडू म्हणून मेस्सीची ओळख आहे. रोनाल्डोच्या तुलनेत मेस्सी सध्या अडचणीत
आहे. प्रतिस्पर्धी संघांना कल्पना आहे की, मेस्सीला थोडी जरी जागा दिली, तर तो खूप धोकादायक ठरेल. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात कोंडी करण्यात येत आहे. त्याचबरोबर, मेस्सीवर अपेक्षांचे खूप मोठे ओझे आहे. खास करून संपूर्ण अर्जेंटिनाला त्याच्याकडून विश्वविजेतेपदाची अपेक्षा आहे. हे ओझेच खेळाडूला अनेकदा भारी पडते. क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे भारताच्या सर्व आशा सचिन तेंडुलकरवर टिकून असायच्या, त्याचप्रमाणे मेस्सीवरही त्याच्या देशवासीयांच्या आशा आहेत, पण सचिन ज्या विश्वचषक स्पर्धांत खेळला, त्यामध्ये जवळपास सर्वच स्पर्धांत तो सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये राहिला आहे. त्याउलट मेस्सी मात्र, विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरला आहे. त्यामुळे यंदा त्याची जादू चालली नाही, तर त्याने अर्जेंटिनासाठी काहीच केले नाही, अशीच त्याची कारकिर्द राहील.
दुसरीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष भारताच्या इंग्लंड दौºयाकडे लागले आहे. इंग्लंडने नुकताच एक सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला असल्याने, भारतापुढे नक्कीच एक तगडे आव्हान असेल, तसेच वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत मोठे वादळ उठले. लंका कर्णधार दिनेश चंदीमल त्याला चेंडू छेडछाड प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. सुरुवातीला चंदीमलने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले, पण जेव्हा पुरावे समोर आले, तेव्हा मात्र त्याने आरोप कबूल केला. त्यामुळे आयसीसीने आता त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली. दखल घेण्याची बाब म्हणजे, स्मिथ-वॉर्नर प्रकरणाला तीन महिनेही झाले नाही आणि त्यांना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागत असतानाही, येथे एक कर्णधार या प्रकरणातून काहीच शिकला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे चेंडू छेडछाड प्रकरण किती गंभीर प्रश्न आहे, हे यावरून दिसून येत आहे.
(संपादकीय सल्लागार)