Argentina vs France: मेस्सी की एमबाप्पे! कोण जिंकणार विश्वचषक? अर्जेंटिना-फ्रान्स यांच्यात अंतिम सामना आज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 05:45 AM2022-12-18T05:45:23+5:302022-12-18T05:45:34+5:30

र्जेंटिनाच्या भात्यात लियोनेल मेस्सी नावाचा ‘हुकमी एक्का’ आहे. मेस्सीला सतत हुलकावणारे एकमेव विश्वविजेतेपद तोच जिंकणार की अनुभवी फ्रान्ससमोर अपेक्षांच्या दडपणापायी अर्जेंटिना ढेपाळणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल.

Messi or Mbappe! Who will win the Fifa World Cup? Final match between Argentina and France today | Argentina vs France: मेस्सी की एमबाप्पे! कोण जिंकणार विश्वचषक? अर्जेंटिना-फ्रान्स यांच्यात अंतिम सामना आज

Argentina vs France: मेस्सी की एमबाप्पे! कोण जिंकणार विश्वचषक? अर्जेंटिना-फ्रान्स यांच्यात अंतिम सामना आज

googlenewsNext

दोहा : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ चा परमोच्च क्षण जवळ आला आहे. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या दोन संघांमध्ये रविवारी रात्री ८:३० वाजेपासून अंतिम लढत होत असून, दोघेही स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहेत. दोन्ही संघांना तिसऱ्या विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा आहे, तर फ्रान्स सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यास उत्सुक आहे. अर्जेंटिनाच्या भात्यात लियोनेल मेस्सी नावाचा ‘हुकमी एक्का’ आहे. मेस्सीला सतत हुलकावणारे एकमेव विश्वविजेतेपद तोच जिंकणार की अनुभवी फ्रान्ससमोर अपेक्षांच्या दडपणापायी अर्जेंटिना ढेपाळणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल. अर्जेंटिनाच्या संघात अनेक चपळ, युवा खेळाडूंचा समावेश आहे; परंतु अनुभवाच्या बाबतीत फ्रेंच संघ सरस आहे. त्यामुळे ही लढत तुल्यबळ ठरते.

अर्जेंटिनाचा प्रवास...

सौदी अरेबियाविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभव  पत्करल्यानंतर अर्जेंटिनाने प्रत्येक सामन्यात किमान दोन गोल केले. मेक्सिको, पोलंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स या संघांविरुद्ध त्यांनी २-० अशी आघाडी घेऊन वर्चस्व गाजवले. क्रोएशियाविरुद्ध ते ३-० ने  विजयी ठरले. पेनल्टी-शूटआउटमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सवर विजय मिळवला. शूटआउटमध्ये अर्जेंटिनाचा संघ विश्वचषकाच्या इतिहासात अत्यंत यशस्वी ठरलेला आहे. केवळ मेस्सीवर  संघ विसंबून नाही. तरुण आणि चपळ आक्रमक फळी आणि बचावफळीनेही या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेली आहे. त्याचवेळी मेस्सी, ओटामेंडी आणि डी मारिया वगळता अन्य खेळाडूंमध्ये अनुभवाची उणीव हा त्यांचा कच्चा दुवा आहे. आघाडी घेतल्यानंतर संघ   ढेपाळतो आणि प्रतिस्पर्ध्यांना प्रतिहल्ल्यांची संधी देतो. ही उणीव नेदरलँड्सविरुद्ध अधोरेखित झाली. मेसीवर त्याच्या कारकिर्दीत शेवटची ट्रॉफी जिंकून देण्याचे दडपण आहे. हे दडपण संपूर्ण संघाला जाणवू शकते.

फ्रान्स तुलनेत सरस...

अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही गतविजेता फ्रान्सचा खेळ इतर संघांच्या तुलनेत सरस ठरला. गुणवत्ता आणि अनुभवाची समृद्धी हे त्यांच्या संघाचे वैशिष्ट्य. एमबापे, ग्रिजमान, गिरूड आणि डेम्बेले या चार जणांचे एकत्रित हल्ले थोपवणे हे अर्जेंटिनाच्या बचावफळीसमोरील आव्हान ठरेल. फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिए देशांप यांचे संयमी मार्गदर्शन हाही या संघाचा महत्त्वाचा दुवा. लियोनेल मेस्सीला ते कसे थोपवू शकतील, यादृष्टीने फ्रान्सच्या बचाव फळीकडे आणि विशेषतः मधल्या फळीकडे असलेला चपळतेचा अभाव त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. इंग्लंड आणि मोरोक्को या दोन्ही संघांनी प्रतिहल्ले करून फ्रेंच बचावफळीला हैराण केले होते.

फ्रान्सचे खेळाडू व्हायरसच्या जाळ्यात
लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला सामोरे जाणे फ्रान्ससाठी सोपे नाही आणि त्यांच्यासाठी हे आव्हान खेळाडूंच्या फिटनेसमुळे आणखी कठीण झाले आहे. फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रान्स संघात व्हायरसच्या घुसखोरीमुळे अनेक प्रमुख खेळाडू आजारी पडले आहेत. व्हेरनमध्ये सौम्य लक्षणे आहेत, परंतु कोनाटे दिवसभर त्याच्या खोलीतच राहिला. खेळाडूंच्या प्रकृतीबाबत फ्रान्स आधीच तणावात आहे. अंतिम सामन्यापूर्वीच संघाचा आणखी एक बचावपटू डेएट उपमेकानो, मिडफिल्डर ॲड्रियन रॅबिओ आणि विंगर किंग्सले कोमन हेदेखील आजारी आहेत.

आमने-सामने
रविवारचा सामना या उभय संघांमधील १३ वा सामना असेल. याआधीच्या  १२ सामन्यांमध्ये अर्जेंटिनाने सहा वेळा बाजी मारली, फ्रान्स तीन वेळा विजेता ठरला, तर तीन सामने बरोबरीत सुटले. विश्वचषकात ही चौथी लढत ठरेल. १९३० मधील स्पर्धेत अर्जेंटिनाने फ्रान्सला १-० असे पराभूत केले होते. १९७८ मध्ये अर्जेंटिनाने २-१ अशी बाजी मारली होती. २०१८ मध्ये हे संघ तिसऱ्यांदा आमने-सामने आले; पण बाद फेरीतील या दोघांमधली ती पहिलीच लढत होती, जी फ्रान्सने ४-३ अशी जिंकली.

कतारमध्ये सर्वत्र अर्जेंटिनाच्या चाहत्यांचीच गर्दी
आपल्या देशाने ३६ वर्षांनंतर विश्वचषक जिंकायला हवा, यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अर्जेंटिनाच्या चाहत्यांची पावले कतारकडे वळली आहेत. राजधानी दोहाच्या रत्स्यांवर सर्वत्र अर्जेंटिनाचे चाहते पाहायला मिळतात. सर्वांच्या ओठांवर ‘मुसासोच’ नावाचे गाणे आहे. अर्जेंटिनासाठी हे गाणे अनधिकृतपणे राष्ट्रगीत बनले.  हे चाहते केवळ अर्जेंटिनातूनचे नव्हे तर युरोप आणि अमेरिकेतूनही येथे दाखल झाले आहेत.  नेमके किती चाहते येथे दाखल झाले, याचा अधिकृत आकडा नसला तरी बाजार, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणे आणि हॉटेल्स अशा ठिकाणी ही गर्दी पाहायला मिळते. निळी आणि पांढरी जर्सी घातलेले हे चाहते मेस्सीच्या नावाचा जयघोष करताना दिसतात.

विश्वविजेत्याला ३४७कोटींचे बक्षीस
फिफा यंदा विजेत्या संघांवर ३६४१ कोटींचा वर्षाव करणार आहे.  त्यात विश्वविजेत्यांना ३४७ कोटी, उपविजेत्याना २४८ कोटी, तिसरे स्थान मिळविणाऱ्या संघाला २२३ कोटी, चौथ्या स्थानावरील संघाला २०६ कोटी रुपये मिळतील. विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व ३२ संघांना प्रत्येकी नऊ मिलियन डॉलर, राउंड ऑफ १६ फेरी गाठणाऱ्यांना प्रत्येकी १३ मिलियन डॉलर आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक देत पराभूत झालेल्या संघांना १७ मिलियन डॉलरचा पुरस्कार दिला जाईल.
आयसीसी टी-२० विश्वचषक विजेत्या इंग्लंडला यंदा १३ कोटींचा पुरस्कार देण्यात आला होता. २०२२ चे आयपीएल जिंकणाऱ्या गुजरात संघाला २० कोटी रुपये मिळाले होते. या तुलनेत फिफा विश्वचषक विजेता संघ कैकपटींनी गर्भश्रीमंत होईल.

या खेळाडूंवर असेल नजर
अर्जेंटिना : ३५ वर्षांचा अनुभवी लियोनेल मेस्सी. त्याचे ५ गोल आहेत. २२ वर्षांचा ज्युलियन अल्वारेज. मेस्सीसोबत शानदार खेळ करीत त्याने चार गोल केले.  
एमिलियानो मार्टिनेझ : सहा फूट उंच असलेला हा चपळ गोलकीपर शूटआउटमध्येही मोलाची भूमिका बजावू शकतो. २४ वर्षांचा फूलबॅक नहुएल मोलिना बलाढ्य बचावपटू असून आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे. एंजो फर्नांडीज हा मधल्या फळीचा आधारस्तंभ आहे

फ्रान्स : २३ वर्षांचा स्ट्रायकर काईलियन एमबाप्पे हा सर्वांत धोकादायक खेळाडू.  वेगवान गोल नोंदविण्यासाठी तो ओळखला जातो. त्याचे पाच गोल आहेत. ३१ वर्षांचा अँटोनियो ग्रिजमन हा बचावात मोठी भूमिका बजावतो. ३५ वर्षांचा कर्णधार हयूगो लाॅरिस हा सलग  दुसऱ्या विश्वचषकावर नाव कोरू इच्छितो. २९ वर्षांचा राफेल वरान हा बचावफळीची अभेद्य भिंत आहे.  ऑरेलियन टचॉमेनी हादेखील मधली फळी भक्कम राखण्यासाठी ख्यातीप्राप्त आहे.

 
 

Web Title: Messi or Mbappe! Who will win the Fifa World Cup? Final match between Argentina and France today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.