मेस्सी, रेपीनो ठरले सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:46 AM2019-09-25T01:46:44+5:302019-09-25T07:12:17+5:30
अर्जेंटिना आणि एफसी बार्सिलोना संघांचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सी याने सोमवारी फिफाचा वर्षांचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
मिलान : अर्जेंटिना आणि एफसी बार्सिलोना संघांचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सी याने सोमवारी फिफाचा वर्षांचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्याचवेळी, महिला गटात अमेरिकेची स्टार खेळाडू मेगान रेपीनो हिला देण्यात आला. विशेष म्हणजे कारकिर्दीत सर्वाधिक सहाव्यांदा मेस्सीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव फुटबॉल ठरला आहे.
मेस्सीला हा पुरस्कार मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. त्याने या पुरस्काराच्या शर्यतीत व्हर्जिल वॉन डिक याला मागे टाकले. वॉन डिक याला मागच्या महिन्यात यूएफचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले होते. वॉन डिक याने मागच्या मोसमात लिव्हरपूल चॅम्पियन्स लीग जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
युवेंट्सचा आक्रमक खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा देखील या पुरस्काराच्या शर्यतीत होता, पण तो सोहळ्यात दिसलाच नाही. मेस्सी आणि वॉन डिक हे आता प्रतिष्ठेच्या बेलोन डियोर पुरस्कारासाठी आव्हान सादर करतील. ही घोषणा डिसेंबरमध्ये होईल.
महिलांमध्ये अमेरिकेची रेपीनो हिने विश्वचषक विजेत्या संघातील सहकारी खेळाडू अॅलेक्स मोर्गन आणि इंग्लंडची लुसी ब्रोंझ यांना मागे टाकत सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला. रेपीनो हिला विश्वचषकात सर्वाधिक गोल नोंदवल्याबद्दल गोल्डन बूट तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कार देण्यात आला होता. लिव्हरपूलचे मॅनेजर जलर्गेन क्लोप यांना सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक आणि अमेरिकेच्या झिल एलिस यांना सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. (वृत्तसंस्था)
बार्सिलोनाच्या यशात मोलाचा वाटा
मेस्सीने विक्रमी सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावला. गत मोसमात बार्सिलोनाला ला लीगा जेतेपद मिळवून देण्यात व संघाला चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत नेण्यात मेस्सीने निर्णायक कामगिरी केली होती. मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२ व २०१५ अशी ५ वर्षे या पुरस्कारावर कब्जा केला होता. रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४, २०१६ व २०१७ साली हा पुरस्कार जिंकला आहे.