मेस्सीचे पुन्हा निवृत्तीचे संकेत; रशियामध्ये स्वप्न पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय संघ सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:08 PM2018-03-20T23:08:05+5:302018-03-20T23:08:05+5:30
ला लीगा, चॅम्पियन्स लीग अशा अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपल्या एफसी बार्सिलोना या क्लबसाठी धडाकेबाज खेळी करणारा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र फारसा चमकला नाही.
बार्सिलोना : ला लीगा, चॅम्पियन्स लीग अशा अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपल्या एफसी बार्सिलोना या क्लबसाठी धडाकेबाज खेळी करणारा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र फारसा चमकला नाही. अर्जेंटिनाचा मुख्य खेळाडू असलेल्या मेस्सीकडून संघाला आणि देशवासीयांना नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात, मात्र प्रत्येक मोक्याच्या वेळी मेस्सी अपयशी ठरला आहे. त्यामुळेच, ‘रशियामध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाला जेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरलो, तर राष्ट्रीय संघ सोडण्याचे हे माझे एकमेव कारण असेल,’ असे वक्तव्य करीत मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले.
दिग्गज दिएगो मॅरेडोना यांच्यानंतर फुटबॉलविश्वात मेस्सी अर्जेंटिनाचा चेहरा बनला. सध्या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाणारा मेस्सी अर्जेंटिना फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत आहे. याआधीही त्याने २७ जून २०१६ रोजी अचानकपणे आपल्या निवृत्तीची घोषणा करीत सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र, देशवासीयांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी मन वळविल्याने मेस्सीने पुनरागमन केले. आतापर्यंत १२३ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या मेस्सीने ६१ गोल नोंदविले आहेत. मात्र, तरी मेस्सीचे देशाला आपल्या कारकिर्दीमध्ये विश्वविजेते बनविण्याचे स्वप्न अद्यापही अधुरे राहिले आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्यावर त्याने आता लक्ष केंद्रित केले आहे. याआधी अर्जेंटिनाने १९८६ साली दिएगो मॅरेडोना यांच्या नेतृत्वाखाली विश्वविजेतेपद पटकावले होते.
२०१४ साली झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला जर्मनीविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे अर्जेंटिनाने सलग तिसºयांदा अंतिम फेरी गाठली होती, मात्र तरीही त्यांना विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यात यश आले नाही. मेस्सीने सांगितले की, ‘२०१४ विश्वचषक अंतिम सामन्यात जर्मनीविरुद्धचा पराभव ताज्या जखमेप्रमाणे आहे. आम्ही सलग तीनवेळा अंतिम फेरी गाठली, परंतु दुर्दैवाने हरलो. त्यामुळे असे वाटते की, तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश करूनही काहीच फायदा झाला नाही. आमच्याविषयी अनेक चर्चा झाल्या. मोठ्या प्रमाणात झालेल्या टीकेमुळे खूप अडचणीसुद्धा आल्या. मात्र, आता अपेक्षा पूर्ण कराव्याच लागतील. जर या वेळीही आम्ही अपयशी ठरलो, तर पुन्हा टीकेला सामोरे जावे लागेल आणि या वेळी टीकाकारांना संधी देण्यास आम्ही इच्छुक नाही.’ (वृत्तसंस्था)
अंतिम फेरी निराशाजनक... मेस्सीने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत अर्जेंटिनाकडून ५ अंतिम सामने खेळले आहेत. मात्र, एकाही अंतिम सामन्यात गोल करण्यात त्याला यश आलेले नाही. यातील तीन अंतिम सामने कोपा अमेरिका स्पर्धेचे असून, आॅलिम्पिक (२००८) आणि विश्वचषक (२०१४) स्पर्धेच्या प्रत्येकी एका अंतिम सामन्याचा समावेश आहे.
जगभरातील चाहते अर्जेंटिनाच्या विश्वविजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. आमचे लक्ष्य केवळ विश्वविजेतेपद पटकावण्यावर केंद्रित झाले आहे. आता मी संघाची मदत करण्यासह कमीतकमी एक फिनिशर बनण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीप्रमाणे आत्ताही मी धावतोय, पण आता एका नव्या भूमिकेतून वाटचाल होत आहे. - लिओनेल मेस्सी