जगज्जेत्या संघातील फुटबॉलपटू वर्णद्वेषी टीकेचा बळी, घेतला टोकाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 09:21 AM2018-07-23T09:21:34+5:302018-07-23T09:21:59+5:30
माजी विश्वविजेत्या जर्मन संघातील मध्यरक्षक मेसूट ओझील याने सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेवर मौन सोडले.
मुंबई - माजी विश्वविजेत्या जर्मन संघातील मध्यरक्षक मेसूट ओझील याने सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेवर अखेर मौन सोडले. टर्किचे अध्यक्ष रिसेप टॅयीप इर्डोगन यांच्यासोबतच्या छायाचित्रावरून ओझीलवर 'वर्णद्वेषी आणि अपमानास्पद' टीका करण्यात येत होती. त्याने यावर प्रतिक्रीया देताना यापुढे जर्मनीच्या संघाकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याने जर्मन फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांवरही टीका केली.
रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत 2014च्या विजेत्या जर्मनीच्या संघाला गटातच गाशा गुंडाळावा लागला होता. 80 वर्षांच्या इतिहासात जर्मनीला प्रथमच अशी लाजिरवाण्या कामगिरीला सामोरे जावे लागले. जर्मनीच्या या मानहानिकारक कामगिरीनंतर ओझील टीकेचा धनी बनवले गेले. विशेषतः त्याला स्वीडनविरूद्धच्या दुस-या सामन्यात खेळण्याची संधी दिलीच नव्हती. तरीही ओझीलवर टीकेचा भडिमार सुरूच राहिला. त्यात ओझील आणि इर्डोगन यांचे एकत्रित असलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले. त्यावर वर्णद्वेषी टीका करण्यात आल्या. इर्डोगन हे मे महिन्यात लंडन येथे आले होते आणि त्यावेळी त्यांनी ओझील व इकाय गुंडोजन या खेळाडूंची भेट घेतली होती.
ओझीलने या टीकेवर मौन सोडले. त्यात त्याने आपल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा दुर्दैवी असून यापुढे जर्मनीच्या संघाकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. ओझील हा टर्कीश-जर्मन खेळाडू आहे, परंतु तो जर्मनीचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे टर्कीच्या अध्यक्षांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
The past couple of weeks have given me time to reflect, and time to think over the events of the last few months. Consequently, I want to share my thoughts and feelings about what has happened. pic.twitter.com/WpWrlHxx74
— Mesut Özil (@MesutOzil1088) July 22, 2018