बलाढ्य रियाल माद्रिदचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:10 AM2019-03-07T04:10:20+5:302019-03-07T04:10:26+5:30
यूरोपियन फुटबॉल लीगमधील बलाढ्य संघात गणना होत असलेल्या रियाल माद्रिद संघाला अयाक्स संघाकडून अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले.
माद्रिद : यूरोपियन फुटबॉल लीगमधील बलाढ्य संघात गणना होत असलेल्या रियाल माद्रिद संघाला अयाक्स संघाकडून अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. यासह रियाल माद्रिदचे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
सलग तीन यूरोपियन जेतेपद पटकावल्यानंतर पहिल्या जेतेपदापासून एक हजारहून अधिक दिनानंतर स्पेनच्या या दिग्गज रियाल माद्रिदला अयाक्स विरुद्ध पराभवाचा तोंड पहावे लागले. मंगळवारी सँटियागो बर्नब्यु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अयाक्सने जबरदस्त आक्रमक खेळ करताना रियाल माद्रिदचा ४-१ असा धुव्वा उडवला. या निराशानजक पराभवासह चॅम्पियन्स लीगमधील रियाल माद्रिदचा दबदबाही संपुष्टात आला. एकूण ५-३ अशा पराभवासह रियाल माद्रिद स्पर्धेबाहेर पडला.
दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोने रियाल माद्रिदला सोडचिठ्ठी देत यूवेंट्स संघासह खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर रियाल माद्रिद अडचणीत आला. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत पहिल्याच वर्षी रियाल माद्रिदच्या जेतेपदाची झोळी रिकामी राहण्याची शक्यता आहे. रियाल माद्रिदचा बचावपटू नॅचो फर्नांडेज म्हणाला की, ‘आम्ही नेहमी चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकू शकत नाही. कधीतरी जेतेपदाची मालिका खंडित होणारच होती.’
याआधी अयाक्स पहिल्या सत्रातील लढतीत रियाल माद्रिदविरुद्ध १-२ असे पराभूत झाले होते. मंगळवारी अयाक्सने हाकिम जियेच (७ वे मिनिट), डेव्हिस नेरेस (१८), दुसान तादिच (६२) व जेसी शोन (७२) यांच्या गोलच्या जोरावर शानदार विजय नोंदवला. रियाल माद्रिदकडून एकमेव गोल मार्को एन्सेसियो याने ७०व्या मिनिटाला केला. (वृत्तसंस्था)