FIFA World Cup 2022: कोण जिंकणार यावेळचा फुटबॉल वर्ल्डकप, मॉडर्न नास्त्रेदेमसने केली अशी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 01:10 PM2022-11-24T13:10:20+5:302022-11-24T13:11:04+5:30
FIFA World Cup 2022: मॉडर्न नास्त्रेदेमस या नावाने प्रसिद्ध झालेल्या एथोस सेलोम याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. फिफा वर्ल्डकप २०२२चा अंतिम सामना कुठल्या दोन संघात खेळवला जाणार याबाबतची भविष्यवाणीही त्याने केली आहे.
दोहा - सध्या कतारमध्ये फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामुळे स्पर्धेत पुढची फेरी कोण गाठणार याबाबत फुटबॉल प्रेमींमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, मॉडर्न नास्त्रेदेमस या नावाने प्रसिद्ध झालेल्या एथोस सेलोम याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. फिफा वर्ल्डकप २०२२चा अंतिम सामना कुठल्या दोन संघात खेळवला जाणार याबाबतची भविष्यवाणीही त्याने केली आहे.
एथोस सेलेम याने भविष्यवाणी करताना सांगितले की, २०२२ च्या फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना आणि किलिएन एमबाप्पे याचा फ्रान्स या संघामध्ये खेळवला जाईल. फ्रान्स फिफा वर्ल्डकपमधील गतविजेता संघ आहे. फ्रान्सने २०१८ मध्ये रशियामध्ये खेळला गेलेल्या वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले होते. आता यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विजेतेपद राखण्याचे आव्हान फ्रान्ससमोर आहे.
थोस सोलेमने अर्जेंटिनाचा संघही फायनलमध्ये जाईल, असं भाकित वर्तवलं आहे. मात्र अर्जेंटिनाला पुढच्या फेरीत जाण्यासाठी पुढचे सामने जिंकावे लागतील. मात्र अर्जेंटिनाला सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाकडून २-१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता.
दरम्यान, एथोस सेलोम याने त्याच्या भविष्यवाणीमध्ये फिफा वर्ल्डकपच्या सेमिफायनलसाठी दावेदार ठरणाऱ्या पाच संघांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. फ्रान्स, बेल्जियम, अर्जेंटिना, ब्राझील आणि इंग्लंड हे उपांत्य फेरीत खेळण्याचे दावेदार असतील असे त्याने म्हटले आहे.
एथोस सेलोम याने हल्लीच केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. कोरोनाची साथ, रशिया युक्रेन युद्ध, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, अशा भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता त्याने फिफा वर्ल्डकप २०२२ बाबत केलेल्या भविष्यवाणीमुळे खळबळ उडाली आहे.