यंदाच्या विश्वचषकात तुटणार सर्वाधिक गोलचा रेकॉर्ड?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 06:27 PM2018-06-27T18:27:48+5:302018-06-27T18:28:46+5:30
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील 100 गोलचा टप्पा ओलांडला गेला आहे. आता एका विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक गोलचा विक्रम मोडला जाणार का याकडे सर्व फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागले आहे.
मॉस्को - रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामन्यागणिक बनत असलेल्या नवनव्या विक्रमांकडे फुटबॉल प्रेमी लक्ष ठेवून आहेत. दिग्गज खेळाडू आणि आघाडीच्या संघांकडून गोलची बरसात सुरू असल्याने स्पर्धेतील 40व्या सामन्याअखेरीस स्पर्धेतील 100 गोलचा टप्पा ओलांडला गेला आहे. आता एका विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक गोलचा विक्रम मोडला जाणार का याकडे सर्व फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागले आहे.
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यात झालेल्या लढतीदरम्यान स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने केलेला गोल हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील 100 वा गोल ठरला होता. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 40 सामन्यांमधून 105 गोल झाले आहेत. तर स्पर्धेतील 24 सामने अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे आता 1998 आणि 2014 च्या विश्वचषक स्पर्धेत नोंदवला गेलेला 171 गोलचा विक्रम मोडला जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या विश्वचषकामध्ये आतापर्यंत इंग्लंड, बेल्जियम आणि रशियाने प्रत्येकी 8 गोल केले आहे. स्पर्धेत खेळत असलेल्या 32 संघांपैकी केवळ कोस्टारिकाला आतापर्यंत दोन सामन्यांमधून एकही गोल नोंदवता आलेला नाही.
खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचा विचार करावयाचा झाल्यास पाच गोलसह इंग्लंडचा हॅरी केन सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याच्यानंतर प्रत्येकी चार गोलसह बेल्जियमचा रोमेलू लुकाकू आणि ख्रिस्टियानो रोनाल्डो दुसऱ्या स्थानावर आहेत.