माँ तुझे सलाम, भाजी विकून तिने घडविला फुटबॉलपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 03:28 AM2017-10-04T03:28:26+5:302017-10-06T11:43:26+5:30
किसी के लिए जुनून दिल में हो तो जिंदगी बदलती हैं!.. त्याचे फुटबॉलवर इतके प्रेम की ‘तिच्या’ डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते.
नवी दिल्ली : किसी के लिए जुनून दिल में हो तो जिंदगी बदलती हैं!.. त्याचे फुटबॉलवर इतके प्रेम की ‘तिच्या’ डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते. खरंच एखाद्या खेळावर इतके प्रेम असू शकते? जॅक्सन सिंहचे होते अन् आहेसुद्धा... फुटबॉल पहिल्यानंतर त्याच्या पायांचा वेग आपोआप वाढतो आणि तो फुटबॉलमय होऊन जातो. जॅक्सन सिंहच्या आईने हा अनुभव ब-याचदा घेतला आणि म्हणून त्याच्या फुटबॉलवरील प्रेमापोटी तिला वाट्टेल ते करण्याची हिंमत आली. भाजी विकण्याचा व्यवसाय करीत या मातेने भारताला एक दर्जेदार खेळाडू दिला आहे.
मणिपूरच्या थोउबल जिल्ह्यात हाओखा ममांग असे गाव आहे. जॅक्सनचे वडील हे पोलीस खात्यात नोकरीला होते. २०१५ मध्ये त्यांना लकवा मारला. त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली होती. कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता.
‘आम्ही खूप कठीण दिवस काढलेत. माझ्या आईमुळे मी आज विश्वचषकात खेळतोय,’ असे सांगत जॅक्सन आईलाच ‘क्रेडिट’ देतो. तो म्हणतो, की २०१० मध्ये मी जेव्हा चंदीगडला आलो तेव्हा सर्व काही ठीक होते. २०१५ मध्ये वडिलांना लकवा मारल्यानंतर आमच्या कुटुंबाची स्थिती नाजूक झाली. माझी आई आणि आजी इम्फाळ येथे भाजी विकायची. माझ्या प्रशिक्षणात तिने कुठलीही अडचण येऊ दिली नाही. खेळात प्रावीण्य होतेच, त्यामुळे चंदीगड अकादमीत मी अनेकांचे लक्ष वेधले. या अकादमीतून मिनर्वा क्लबकडून खेळणारा मी पहिला खेळाडू ठरलो. त्यानंतर १५ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
मी लहानपणापासून भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहत होतो. १७ वर्षांखालील विश्वचषकाच्यानिमित्ताने ते पूर्ण होत आहे. विश्वचषकाची जर्सी चढवण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. आता आयुष्यात बरेच बदल झाल्याचे जॅक्सनने सांगितले.
जॅक्सनच्या वडिलांची नोकरी गेल्यानंतर परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न तिच्यापुढे होता. अशा कठीण स्थितीतही तिने जॅक्सनला फुटबॉलपासून वंचित केले नाही. त्याला प्रशिक्षण मिळावे, म्हणून तिने भाजी विकण्याचे ठरवले.
इम्फाळचे ख्वैरामबंद हे मार्केट तिच्या घरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. एवढे अंतर रोज पार करीत ती मार्केटमध्ये जायची. जॅक्सनच्या वडिलांना लकवा मारल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर होती. ही जबाबदारी तिने उत्कृष्टपणे
सांभाळली.